Rohit Pawar : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मात्र काही वेळातच हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. या प्रकारावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या व्हिडिओवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले, त्यांना सगळ्याच गोष्टीत राजकारण दिसते. मी पुन्हा येईन असे म्हणताना त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत आहेत. महाराष्ट्र आज पेटलाय, समृद्ध महाराष्ट्राचे दिवस पु्न्हा आणायला पाहिजेत, असे न बघता त्यांना पदाचे पडले आहे. दिल्लीत जाऊन तुम्ही मुख्यमंत्रिपदाची हीच चर्चा केली का, असा सवाल आ. पवार यांनी विचारला. राज्यात मराठा, धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना तुम्ही या विषयाची चर्चा दिल्लीत का करत नाहीत, असा जाब त्यांनी फडणवीसांना विचारला. दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रीपद याचीच चर्चा करतात का असा सवाल उपस्थित करत तुम्ही मंत्रिपद खेळत राहा लोकच तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
Eknath Shinde : भाजपाची चाल, शिंदेंचं मौन; ‘त्या’ व्हिडिओवर थेट उत्तर टाळलं
शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे गटाकडे ४० तर भाजपचे १०५ आमदार होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली होती. यामुळे भाजपचे अनेक नेते नाराज झाले होते. काल अचानक भाजपने फडणवीस यांचा व्हिडिओ ट्विट केला. यात फडणवीस मी पुन्हा येईनचा नारा देत आहेत. फडणवीस यांच्या व्हिडिओनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्वीटमध्ये नेमकं काय होतं?
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल, असं कॅप्शन देत भाजपने एक व्हिडिओ ट्वीट केला होता. मी पुन्हा येईन… नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन… गावांना जलयुक्त करण्यासाठी, मी पुन्हा येईन… शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…. असं फडणवीस या व्हिडिओत म्हणतांना दिसत आहेत.