Download App

Rohit Pawar : ‘एसी’त बसून धोरण करणारं सरकार; रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar : ज्या भागात नवीन एमआयडीसी याव्यात यासाठी प्रयत्न केले जातात तिथेही राजकारण केलं जातं जसं माझ्या मतदारसंघात आज सुरू आहे. या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतील. पण, मागील काही वर्षांपासून प्रोजेक्ट आपल्या राज्यात न राहता अन्य राज्यात चालल्याचे आपण पाहत आहोत. बेरोजगारी राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. सरकार धोरणांबद्दल बोलत नाही. आयटी कंपनी मोठ्या शहरांत कशी येईल यासाठी तुम्ही धोरण करता पण अन्य जिल्ह्यांत आयटी आणण्यासाठी वेगळं धोरण करावं लागेल पण यावरही चर्चा केली जात नाही. हे सरकार एसीत बसून, अधिकाऱ्यांशी चर्चा करून धोरण तयार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित (Rohit Pawar) पवार यांनी केले.

युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आमदार पवार आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी युवकांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पवार पुढे म्हणाले, ज्यावेळी आमदार म्हणून आम्ही बोलत असतो त्यावेळी आमचं वय काढलं जातं. तुम्ही फार तरुण आहात, तुम्हाला काही कळत नाही. तुम्हाला राजकारणात अजून खूप काही शिकायचं आहे. परंतु, ज्यावेळी आम्ही युवकांशी संवाद साधतो त्यावेळी आम्हाला हे मुद्दे महत्वाचे वाटतात. वय हा फॅक्टर नाही.

Assembly Elections : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; 3 डिसेंबरला येणार निकाल

तुम्ही लोकांना समजून घेत आहात का?, त्यांच्यापर्यंत पोहोचताय का? की फक्त एसीत बसून अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुम्ही निर्णय घेताय यात खूप मोठा फरक आहे. हे सरकार एसीत बसून, अधिकाऱ्यांशी चर्चा करून धोरण तयार करत आहे. जर लोकांच्या हिताचा निर्णय घेणारं हे सरकार असतं तर सामान्य कुटुंबातील मुलामुलींकडून हजार रुपये घेतले नसते. ते परत दिले असते. एमपीएससीत मोठ्या नियुक्त्यात गोंधळ आहे, असा आरोप रोहित पवार यांनी यावेळी केला.

आताचे राज्यकर्ते खोटारडे

काँट्रॅक्टवर भरती करण्याची संकल्पना सरकारने आणली आहे. काँट्रॅक्ट कंपन्या कुणाच्या आहेत याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे. तुम्ही जर काँट्रॅक्ट भरती करणार असताल तर त्यातून युवकांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. काही म्हणतात हा जुना जीआर आहे तर तसं नाही. आताचे राज्यकर्ते खोटं बोलत आहेत. कुठेतरी आधीच्या सरकारने हा जीआर काढला म्हणून यावर कुणीच बोलायचं नाही असं असेल तर आम्ही या गोष्टीचा निषेध करतो.

.. तर आम्ही शंभर टक्के विरोध करणार

राज्यातील रोजगार निर्मिती, भरतीबाबत धोरण तयार करताना त्यात जर तुम्ही व्यावसायिकांचा विचार करणार असाल तर युवकांचा करणार नसताल तर आम्ही त्याला शंभर टक्के विरोध करू असा इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर आता राज्य सरकारच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत.

 

Tags

follow us