Download App

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास प्रशांत जगताप मंत्री होणार? सुप्रिया सुळे मंचावरून थेट बोलल्या

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मंचावर बसलेल्यापैकी मंत्री होणार, असं थेट विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या.

Supriya Sule : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मंचावर बसलेल्यापैकी मंत्री होणार, असं थेट विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यात केलं आहे. त्या पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

बदलापूर आंदोलनात ‘लाडकी बहीण योजनेचं बॅनर कसं? भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा विरोधकांवर वार

सुप्रिया सुळे यांनी भाषणादरम्यान अनेक गोष्टीवर भाष्य केलं. यामध्ये बदलापूरची घटना, बदलती शिक्षण पद्धती तसेच सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, मंचावर पुण्यातील विधानसभेसाठी इच्छुकांसमोर मंत्रीपदाचे भाष्य करत गुगली टाकली. सुळेंनी राजीव ई- लर्निंग स्कूलची स्तुती करत ही आदर्श महापालिकेची शाळा असल्याचं म्हटलं तर बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध केला. या प्रकरणी बोलताना पुढे त्या म्हणाल्या, सरकारने संवेदनशीलपणे बोललं पाहिजे हा सामाजिक प्रश्न आहे, मी म्हणत नाही यात प्रत्येकवेळी सरकार दोषी असेल पण सत्तेत असलेल्या लोकांनी नैतिकता दाखवायला हवी ते आम्हाला नेहमी नैतिकता शिकवतात, असा टोमणा लगावायला देखील त्या विसरल्या नाहीत.

पुढे त्या म्हणाल्या, ते जेव्हा जय श्रीराम म्हणतात तेव्हा मी मर्यादा पुरुषोत्तम जय श्रीराम म्हणते. आज देशात प्रचंड अंधश्रद्धा वाढीला लागली आहे. या देशात मतदार सरकार ठरवतात AI ठरवत नाही. कितीही AI आले तरी शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असं मत सुळे यांनी शिक्षकांबद्दल व्यक्त केलंय.

मंचावर बसलेल्यांपैकी मंत्री होणार?
सुळे भाषण करत असताना मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष, प्रशांत जगताप, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रमेश बागवे आणि आबा बागुल आदी उपस्थित होते. यावेळी सुळे म्हणाल्या की, आमचं महाविकास आघाडीच्या सरकार आल्यावर मंचावर बसलेल्यांपैकी काहीजण मंत्री होतील, असं असं विधान करत त्यांनी गुगली टाकली अन यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

“आंदोलनाला राजकीय म्हणता लाजा वाटू द्या”; बदलापुरातील आंदोलनावरून जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, सुळे यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुळेंच्या भाषणादरम्यान मंचावर उपस्थितांपैकी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप सोडले तर सर्वच काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यामध्ये माजी मंत्री राहिलेले रमेश बागवे, शिवाजीनगर विधानसभेसाठी इच्छुक असलेले अरविंद शिंदे तर पर्वतीमधून विधानसभेसाठी इच्छुक असलेले आबा बागुल उपस्थित होते. यामुळे सुळे यांनी केलेलं विधान प्रशांत जगताप यांच्यासाठी होतं की पुणे कॅन्टोन्मेंट मधून पुन्हा एकदा विधानसभेची तयारी करत असलेले रमेश बागवे यांच्यासाठी की अन्य उपस्थितांसाठी होतं याची चर्चा मात्र जोरदार रंगली आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हडपसरमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. ज्यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंड करत महायुती सोबत युती केली त्यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले होते. त्यामुळे हडपसर मधून त्यांना विधानसभेचे उमेदवारी द्यायची आणि निष्ठतेची बक्षिशी म्हणून पहिल्याच टर्ममध्ये मध्ये मंत्री करण्याचा विचार तर सुप्रिया सुळे यांच्या मनामध्ये नाही ना?, अशाही चर्चा आता रंगायला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आबा बागुल हे काँग्रेसवर नाराज आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. मात्र त्यांची पुन्हा लोकसभेपुर्वीच स्व पक्षाशी दिलजमाई झाली होती. बागुल सध्या पर्वतीमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच बागुल यांची राष्ट्रवादीशी वाढत्या जवळीकतेमुळे बागुल यांच्या मनात नेमकं काय चाललंय यांच्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू व्हायला सुरुवात झाली आहे.

follow us