Download App

वळसे पाटील शरद पवारांच्या डोक्यात फिट्ट; “आंबेगावची काळजी करु नका”, म्हणत दिला इशारा

पुणे : होईल, होईल, आंबेगावला सभा होईल. त्याबाबत तुम्ही काही काळजी करु नका, असं म्हणत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा आंबेगावमधील सभेच्या चर्चांना हवा दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून पवार आज जुन्नर दौऱ्यावर होते. या कार्यक्रमापूर्वी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. (NCP National President Sharad Pawar has said that the rally will be held in Ambegaon constituency of Dilip Valse Patil)

शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि मानसपुत्र मानले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटात सामील झाले. त्यानंतर शरद पवार यांनी बंडखोरी केलेल्या मंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घेणार असे जाहीर केले होते. यात ते पहिली सभा वळसे पाटील यांच्या आंबेगावात घेणार, असे सांगण्यात आले. मात्र त्यांनी पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवल्यात घेतली. त्यानंतर दुसरी सभा बीडला, तिसरी कोल्हापूरला आणि चौथी सभा जळगावला घेतली. त्यामुळे पहिली सभा ज्या आंबेगावमध्ये होणार होती ती सभा कधी होणार याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला.

गाडीत बसवलं, घरी नेलं, जुन्या शिलेदाराची भेटही घडवली : अजितदादांच्या आमदाराकडून पवारांचा पाहुणचार

वळसे पाटील म्हणजे पवार यांचे मानस पुत्रच :

अजित पवार यांचं बंड किंवा नाराजी शरद पवार यांना अपेक्षितच होते. गेले काही वर्ष पवार यांना अजितदादांच्या नाराजीविषयीची पूर्ण कल्पना होती. ही नारीज दूर करण्याचे काम पवार यांनी वेळोवेळी वळसे पाटील यांच्यावरच सोपवले होते. वळसे पाटील बोलले म्हणजे पवार यांचेच ते मत आहे अशी धारणा राष्ट्रवादी आणि इतर पक्षातही होती. प्रफुल्ल पटेल-अजित पवार हे 2019 पासूनच राष्ट्रवादीने भाजपसोबत जावं या मतासाठी आग्रही होते. त्या गटात दिलीप वळसे पाटील नव्हते. शरद पवार जिकडे जातील तिथंच वळसे पाटील हे गृहीत होतं.

जुन्नर दौऱ्यात शरद पवारांची गोळाबेरीज; दिवंगत काँग्रेस नेत्याच्या लेकाला उमेदवारी मिळण्याची चर्चा

मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तीकर खात्याने छापेमारी केली होती. यामुळे वळसे पाटील देखील भाजपसोबत जावं आणि कटकट संपवावी या मताचे झाले असे बोलले जाते. मात्र पवारांसाठी हा धक्का होता. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांनी देखील वळसे पाटील यांना मानस पुत्र मानले होते. मात्र आपणच बोट धरुन राजकारणात आणलेला मुलगा आपल्याचविरोधात बंडखोरी करेल याची कल्पनाही पवार यांनी कधी केली नसावी. त्यामुळेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांमध्ये पहिला धडा हा वळसे पाटील यांनाच शिकविण्याचे मनावर घेतले होते. मात्र अद्याप त्यांनी ही नियोजित सभा घेतलेली नाही.

मुख्यमंत्रीपदावरुन वळसे पाटील-पवार यांच्यामध्ये वाद :

बंडानंतरच्या काळात वळसे पाटील आणि पवार यांच्यामध्ये वादाचे प्रसंगही उभे राहिले. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही, अशी टीका त्यांनी पवारांवर केली होती. त्यावरुन त्यांना मोठ्या टीकेला समाोरे जावे लागले होते. त्यानंतर पवार यांनीही वळसे पाटील यांना इतिहासाची आठवण करुन देत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते.

Tags

follow us