गाडीत बसवलं, घरी नेलं, जुन्या शिलेदाराची भेटही घडवली : अजितदादांच्या आमदाराकडून पवारांचा पाहुणचार
जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे राजकीय विचारधारेच्या पलिकडे जाऊन सलोख्याचे संबंध राखण्यासाठी, जुना स्नेह जपण्यासाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज (1 ऑक्टोबर) जुन्नरमध्ये आला. राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद 2023 साठी शरद पवार आज (1 ऑक्टोबर) जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अजित पवार गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा पाहुणचार स्विकारला. तसंच जुने सहकारी आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचीही भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. (Sharad Pawar accepted the hospitality of Junnar MLA Atul Benke of Ajit Pawar group)
राष्ट्रवादीतील बंडानंतरही शरद पवार यांनी सर्वांशीच उत्तम संबंध ठेवले आहेत. अगदी अजित पवार यांच्यापासून, प्रफुल्ल पटेल आणि सर्व आमदार पवारांसोबत वावरताना, फोटो काढताना दिसून येतात. कालच लातूरमध्ये मंत्री संजय बनसोडे यांनी पवार यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित राहत पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यापूर्वी पवार यांनीही बनसोडे यांना जवळ घेत शेजारी जागा दिली. त्यानंतर आज शरद पवार आणि अतुल बेनके यांनी एकत्रित प्रवास करत सर्वांनाच कोड्यात टाकले. त्यावर मी आणि अतुल बेनके यांनी एकत्र जेवण केलं असं म्हणत कोणताही आडपडदा न ठेवता पवार यांनीही या भेटीबाबत स्पष्ट उत्तर दिले, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
नेमके काय घडले?
आमदार अतुल बेनके यांनी आज जुन्नरमध्ये राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद 2023 चे आयोजन केले होते. यासाठी शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्विकारत शरद पवार यांनी आज परिषदेला हजेरी लावली. मात्र कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी अतुल बेनके यांनी पवार जुन्नरमध्ये येताच त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना आपली गाडीही दिली. त्यावेळी पवार यांनीही बेनके यांना हाताला धरून गाडीत बसवत एकत्र प्रवास केला. यानंतर पवार यांनी बेनके यांच्या घरी जात जुने सहकारी वल्लभ बेनके यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शिवाय मी आणि अतुल बेनके यांनी एकत्र जेवण केलं असं म्हणतं भेटीबाबत भाष्यही केलं.
अतुल बेनकेंना उमेदवारी मिळणार का?
दरम्यान, एकत्र जेवण केल्यानंतर अतुल बेनके हेच जुन्नरचे उमेदवार असणार का? असा प्रश्न विचारताच पवार यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. जुन्नरमधून कोण उमेदवार? याचे उत्तर देताना ते म्हणाले,जुन्नरचा उमेदवार हा मी ज्या राष्ट्रवादीचा आहे, त्या पक्षाचा असेल. या जागेच्या उमेदवारांबाबत मी निर्णय घेणार आहे, पण निवडणुकीला अजून वेळ आहे. जुन्नर तालुक्यातील जनतेबाबत अनेक वर्षापासून माझा असा अनुभव आहे की, ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाही, अशीही गुगली त्यांनी टाकली.