जुन्नर दौऱ्यात शरद पवारांची गोळाबेरीज; दिवंगत काँग्रेस नेत्याच्या लेकाला उमेदवारी मिळण्याची चर्चा

जुन्नर दौऱ्यात शरद पवारांची गोळाबेरीज; दिवंगत काँग्रेस नेत्याच्या लेकाला उमेदवारी मिळण्याची चर्चा

जुन्नर : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यानुसार ते प्रत्येक मतदारसंघात कोण पर्याय होऊ शकतो याची चाचपणी करताना दिसून येत आहे. याच दरम्यान त्यांनी आज (1 ऑक्टोबर) जुन्नर दौऱ्यात काँग्रेसचे दिवंगत नेते सोपान शेरकर यांचे पुत्र आणि विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची भेट घेतली. या भेटीतून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पवार यांनी गोळाबेरीज केली असल्याची चर्चा रंगली आहे. (Sharad Pawar met Satyasheel Sherkar, son of late Congress leader Sopan Sherkar and Chairman of Vighnahar Sugar Factory during his visit to Junnar)

राष्ट्रवादीतील फूटीनंतर जिल्ह्यातील 10 पैकी शिरुरचे अशोक पवार वगळता सर्वच आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. यात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचेही नाव घ्यावे लागते. सुरुवातीला बेनके यांनी आपली भूमिका जाहीर न करण्याचा आणि दोन्हीकडून उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायाला मिळाले होते. मात्र सध्या ते अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत. याच बंडानंतर शरद पवार आज पहिल्यांदा जुन्नरमध्ये आले होते. त्यामुळे नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दौऱ्याच्या सुरुवातीलाच पवार यांनी शेरकर यांच्या घरी जात पाहुणाचार स्विकारला.

गाडीत बसवलं, घरी नेलं, जुन्या शिलेदाराची भेटही घडवली : अजितदादांच्या आमदाराकडून पवारांचा पाहुणचार

सत्यजीत शेरकर असणार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा चेहरा?

पवार यांनी आजच्या दौऱ्यात पत्रकार परिषदही घेतली. यात त्यांना जुन्नरचा उमेदवार कोण असणार असा सवाल पत्रकारांना विचारला. यावर ते म्हणाले, जुन्नरचा उमेदवार हा मी ज्या राष्ट्रवादीचा आहे, त्या पक्षाचा असेल. या जागेच्या उमेदवारांबाबत मी निर्णय घेणार आहे, पण निवडणुकीला अजून वेळ आहे. जुन्नर तालुक्यातील जनतेबाबत अनेक वर्षापासून माझा असा अनुभव आहे की, ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाही, अशीही गुगली त्यांनी टाकली. शेरकर यांचे नावही त्यांनी घेतले नाही. मात्र उपस्थितांमध्ये या भेटीची जोरदार चर्चा सुरु होती.

Raj Thackeray : कुठेतरी आपले चुकतेय ? ठाकरेंनी डिजेवरून फटकारले

सत्यशील शेरकर हे काँग्रेसचे खेडचे माजी खासदार निवृत्ती शेरकर यांचे नातू तर दिवंगत ज्येष्ठ नेते सोपानशेठ शेरकर यांचे सुपुत्र आहेत. निवृत्ती शेरकर यांनी विघ्नहर साखर कारखान्याची स्थापना केली. सोपान शेरकर यांनी हा कारखाना पुढे यशस्वी संभाळला. त्यानंतर आता सत्यशील शेरकरही याच कारखान्याचे अध्यक्ष असून त्यामाध्यमातून ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. या कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने जुन्नर तालुक्यातील राजकारण शेरकर यांच्या भोवती फिरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. शेरकर यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातूनही त्यांना मानणारा मोठा वर्ग या भागात तयार केला आहे. त्यामुळे आता आजच्या पवार भेटीनंतर आगामी निवडणुकीत जुन्नरमधून ते राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून पुढे येतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube