Kanhaiya Kumar : NEET UG 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहारामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आज देशव्यापी ‘छात्रों की गूंज’ अभियानाची घोषणा केली आहे. हे अभियान पुढील ४० दिवस देशातील २८ प्रमुख शहरांमध्ये राबवले जाणार असून, याद्वारे विद्यार्थी, नोकरीचे इच्छुक तरुण, कोचिंग हब, महाविद्यालयीन परिसर, वाचनालये आणि युवा गटांशी व्यापक संवाद साधला जाईल, अशी माहिती काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी दिली. यावेळी प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे तसेच पुणे काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.
काँग्रेसने या अभियानांतर्गत प्रामुख्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, “पारदर्शकता आणि सुधारणांच्या नावाखाली भाजप सरकारने विद्यार्थ्यांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लादली, मात्र आज ती ‘नॅशनल ट्रॉमा एजन्सी’ बनली आहे.” गेल्या काही वर्षांत देशभरात जवळपास ८९ पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत, तरीही कोणत्याही मोठ्या सूत्रधाराला किंवा राजकीय संरक्षण देणाऱ्याला अटक झालेली नाही, केवळ लहान दलालांना पकडून मूळ मास्टरमाइंडला वाचवले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
देशाचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी कोटा येथे मांडली आकडेवारी
नुकत्याच राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या विद्यार्थी अधिवेशनात राहुल गांधी यांनी आकडेवारीसह देशातील शिक्षण व्यवस्था ही मूलतः “Rejection System” बनली असल्याचे दाखवून दिले. देशात प्रत्येक ३,००० विद्यार्थ्यांपैकी केवळ एक विद्यार्थी IAS अधिकारी बनतो. फक्त ३० विद्यार्थी IIT मध्ये प्रवेश मिळवू शकतात आणि केवळ १८० विद्यार्थी डॉक्टर होतात. उर्वरित लाखो विद्यार्थ्यांना संधी नव्हे, तर केवळ नकार मिळतो. देशाचे एकूण शिक्षण बजेट सुमारे २.१४ लाख कोटी रुपये आहे, तर फक्त २२ लाख NEET परीक्षार्थींचा एकत्रित खर्च जवळपास १.३२ लाख कोटी इतका प्रचंड आहे. देशातील पाच प्रमुख परीक्षा (SSC, UPSC, RRB, JEE आणि NEET) ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकत्रित खर्च भारत सरकारच्या एकूण शिक्षण अर्थसंकल्पाच्या जवळपास तिप्पट आहे.
काँग्रेस पक्षाच्या तीन प्रमुख मागण्या:
१. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा व चौकशी: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. पेपरफुटी माफिया, विक्रेता संस्था आणि अधिकारी यांच्या राजकीय संबंधांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
२. परीक्षा व्यवस्थेची पुनर्रचना: NTA ची पुनर्रचना करण्यात यावी. प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया, मुद्रण व्यवस्था, वाहतूक साखळी, परीक्षा केंद्रे आणि डिजिटल प्रणाली सुरक्षित करून प्रत्येक टप्प्याची चौकशी व्हावी.
३. निश्चित परीक्षा व भरती दिनदर्शिका: वार्षिक परीक्षा आणि भरती दिनदर्शिका लागू करून परीक्षा, निकाल आणि नियुक्तीच्या तारखा आगाऊ जाहीर कराव्यात व त्याचे काटेकोर पालन व्हावे.
‘छात्रों की गूंज’ अभियानाचा देशव्यापी कार्यक्रम:
३० जूनपासून: २८ शहरांमध्ये पत्रक वाटप, विद्यार्थी संपर्क अभियान आणि चौकसभा.संपूर्ण जुलै महिनाभर: साप्ताहिक कार्यक्रम, महाविद्यालयीन संपर्क मोहीम आणि ‘आंबेडकर संवाद’.
१ ऑगस्ट २०२६: सर्व २८ शहरांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य घेराव आंदोलन.
९ ऑगस्ट २०२६: “दिल्ली चलो” अभियानाद्वारे पहिल्या टप्प्याची सांगता, ज्यामध्ये देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून सामूहिक आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवला जाईल.
काँग्रेस पक्षाने देशभरातील विद्यार्थ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, नोंदणीसाठी www.chhatronkigoonj.in हे संकेतस्थळ आणि 9873036161 हा मिस्ड कॉल क्रमांक जारी केला आहे. “ही लढाई केवळ NEET पुरती मर्यादित नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी आहे,” असे पुणे शहर समन्वयक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले.
