पुणे: राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आणि मावळमधील आरटीआय कार्यकर्ते सुनील रघुनाथ गुजर (Sunil Gujar) यांच्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार वाद झाला होता. या प्रकरणी दोघांनीही एकमेकांविरोधात बंडगार्डन पोलिसांकडे परस्परांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. या प्रकरणी गुजर यांच्या तक्रारीवरून आमदार सुनील शेळकेंविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मावळमधील पिंपळोशी कामशेत येथील सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर हे शुक्रवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. ते अॅड. अभिजित आवारे यांच्या कार्यालयात कामकाज करतात. गुजर व त्यांचे सहकारी करुणा सेरोदे हे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पॅसेजमध्ये उभे होते. त्यावेळी आमदार सुनिल शेळके व त्यांचे कार्यकर्ते आले. आमदार सुनील शेळके यांनी ‘ऐ भामट्या’ असे म्हणून गाडीतूनच गुजर यांना शिवीगाळी केली. त्यावेळी गुजर यांचे सहकारी करुणा सरोदे व शेळके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. झटापट गुजर यांच्याकडील बॅगेमध्ये काय आहे, असे दाखविण्याचा अट्टाहास धरला. त्यवेळी गुजर ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत गेले. त्यावेळी आमदार सुनील शेळके व त्यांचे कार्यकर्ते पाठीमागे आले. सरोदे यांच्या हातातील बॅग आमदारांनी हिसकावून घेत कागदपत्रांची पाहणी केली. तू माझ्या विरोधात दुसऱ्याचे नावे माहिती अधिकारीत माहिती घेऊन माझी माहिती माझ्या विरोधकांना, तसेच गुंड प्रवृत्तीचे लोकांना का पुरवती असे मोठमोठ्याने आरडा ओरडा करून रागाच्या भरात त्यांनी माझ्या डाव्या गालावर ठोसा मारला, असे गुजर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मी आरटीआय कार्येकर्ता असून, मला कोणाचे ही माहिती काढणेचे अधिकारी आहोत. आणि ते मी माझा अधिकार बजावित आहे. मी कोणाचेही माहिती कोणालाही दिली नाही. मी भ्रष्टाचार उघड करतो. मी एमआयडीसी तळेगाव आंबळेगाव येथील माहिती घेत आहे. ती मी माहितीचे अधिकारात माहिती जनहितासाठी प्राप्त करीत आहे सांगत असताना त्यांनी 112 या वर कॉल करुन पोलीसांना बोलविले आहे. त्यावेळी पोलिस आले.
पोलिस मला गाडीवर बसवून घेऊन असताना आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी “ह्याला पोलीसांचे गाडीवर नको आपल्या गाडीत न्या व ह्याचा किशोर आवारे ह्याचे सारखा कार्यक्रम करा” असू बोलु लागले. परंतु मी गाडीत न बसता पोलीसांचे गाडीवर बसून माझे कडील बॅग व मोबाईलसह घेऊन आलो. त्यावेळी पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर माझ्याकडील बॅग पोलिसांसमोर तपासली. त्यात बॅगेत असलेली माझी पगाराची रक्कम व एक मोबाईल माझ्या ताब्यात पोलिसांनी दिला. त्यावेळी बॅगमधील खांड मावळ टाटा कंपनीची फाईल व मुलीचा व भावाचा कुणबी दाखला असा गहाळ असल्याचे माझा निदर्शनात आले, असे तक्रारीत गुजर यांनी म्हटले आहे.
सुनील शेळकेंचा गुजर यांच्यावर गंभीर आरोप
तर सुनील शेळके यांनी सुनील गुजर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या वर्षभरापासून आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केलाय. आरटीआयच्या माध्यमातून स्वतःशी संबंधित माहिती मिळवून ती विरोधकांसह गुन्हेगारांना पुरवली जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने आरटीआय अर्ज करून आपल्याशी संबंधित कागदपत्रं मिळवण्यात आल्याचा आरोपही शेळके यांनी केला.
