पुणे : बहुजन समाज एकत्र येऊन काम करत राहिल्यास सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता आपल्यात आहे. मात्र त्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता आहे, त्यांच्या मदतीची जाण आपण ठेवायला हवी, अशी भावना कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली. ते पुण्यात बोलत होते.
राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शिवाजीनगर येथील ताराबाई वसतिगृहाची पायाभरणी करण्यात आली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते वसतीगृहाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण कार्यक्रम पार पडला. यावेळी पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीच आणि आरएमडी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्नुषा ताराबाई यांच्या नावाने वसतीगृहाची पायाभरणी झाली आहे ही चांगली गोष्ट आहे. शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे जिथे आपण जितके काम करू तितके कमी आहे. इतर शैक्षणिक संस्थेच्या बरोबरीने किंवा पुढे जायचे असेल तर सामाजिक आणि वैचारिक लोकांनी यामध्ये अधिक लक्ष घालून जोमाने काम पुढे न्यायला हवे.
शाहु महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुनीत बालन म्हणाले, पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच गरजू लोकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. छत्रपती ताराबाई वसतीगृहाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना फायदा होईल. या इमारतींना संस्थेने रसिकलाल माणिकचंद धारीवाल आणि इंद्राणी बालन अशी नावे देण्याच्या घेतलेल्या निर्णायाचे बालन यांनी यावेळी आभार मानले.
यावेळी माजी आमदार काँग्रेसचे उल्हास पवार, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहर प्रमुख संजय मोरे, प्रमिला गायकवाड, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, सत्येंद्र कांचन, विलास गव्हाणे हेही यावेळी उपस्थित होते.