पिंपरी–चिंचवड : निवडणुकांमध्ये महिला मतदारांना दिल्या जाणाऱ्या थेट आर्थिक लाभाचा राजकीय फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी अनोखा प्रस्ताव मांडला आहे. आपल्या प्रभागातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी त्यांनी थेट जागतिक बँकेकडे ३० कोटी रुपयांचे कर्ज मागितले असून, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
मुंबईत परवडणारे घरे उपलब्ध होणार; फडणवीसांचे मंत्रिमंडळात 6 सुपर-डूपर निर्णय
आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १७ मधून नगरसेवकपदासाठी उमेदवारी जाहीर केलेले पाटील यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांनी बिहार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील निवडणुकांदरम्यान महिलांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेने मतदानाच्या पद्धतीवर प्रभाव पडल्याचे उदाहरण देत, अशा लाभयोजना महिलांच्या दीर्घकालीन प्रगतीस अपुऱ्या असल्याचे सांगत, सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग १७ मधून नगरसेवकपदासाठी उमेदवारी जाहीर केलेले पाटील यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.#PCMC #SharadPwar #Punenews @PawarSpeaks @NCPspeaks @supriya_sule @RRPSpeaks @AjitPawarSpeaks pic.twitter.com/iqa4Zlknfx
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 18, 2025
पुढे पत्रात पाटील लिहितात की, प्रभाग १७ मध्ये सुमारे ३० हजार महिला मतदार आहेत. “भाजपच्या आठ वर्षांच्या कारभारावरून पाहता, प्रत्येक महिलेला १० हजार रुपये देणे त्यांच्यासाठी अवघड नाही. मात्र मी १०, हजार १ रुपये देऊ इच्छितो तेही फक्त निवडणूक म्हणून नाही, तर खरच महिलांच्या आर्थिक बळकटीसाठी दीर्घकालीन उपक्रमांची सुरूवात म्हणून,” असेही त्यांनी सांगितले.
महिलांसाठी कौशल्यविकास, उपजीविकेच्या संधी आणि स्वावलंबन वाढवण्यासाठी पुढील काळात प्रणालीबद्ध काम करण्याचे आश्वासन देत, घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज प्रामाणिकपणे फेडण्याची हमी पाटील यांनी दिली आहे. कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धती अवलंबण्याचे आश्वासनही त्यांनी पत्रात दिले.
Video : कोण ओळखतो त्या खडसेला?; महाजनांनी घरातला वाद काढत केला जिव्हारी लागणारा वार
जागतिक बँकेकडे काय केली मागणी?
३०,००० महिला × १०,००१ रुपये = एकूण ₹३०,००,३०,०००
या कर्जाच्या सहाय्याने स्त्रीशक्तीचे आर्थिक सबलीकरण साध्य होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. जागतिक बँक या विनंतीवर काय भूमिका घेते, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी महिलांना थेट आर्थिक लाभ देणे हा निवडणुकीतील प्रभावी मार्ग असल्याची वस्तुस्थिती, विविध राज्यांच्या निकालांवरून दिसून आल्याचे ते म्हणाले. आता यावर जागतिक बँकेकडून काय रिप्लाय येतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छूक उमेदवार चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवतांना दिसत आहेत. त्यामुळे पाटील यांनी जागतिक बँकेकडे केलेली मागणी मान्य होईल न होईल हा भाग वेगळा मात्र त्यांच्या अनोख्या मागणीने सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. हे मात्र नक्की.
