शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेची चौकशी करण्याचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
या चौकशी आदेशानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी पंगा घेतला आहे. त्यांनी पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (Pawar) राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान ठरलेल्या उद्देशासाठीच वापरले जाते का? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने राज्याच्या साखर आयुक्तांना दोन महिन्यांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या नियामक मंडळावर उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि जयप्रकाश दांडेगावकर यांचा समावेश आहे.
या चौकशी आदेशानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, काही लोक जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय होत आहे. आम्हाला मारलं जात आहे, अशा प्रकारचा माहोल तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक विनाकारण आम्ही शहीद होत आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
ज्यावेळेस गाळप हंगामाची बैठक झाली होती, त्या बैठकीत वेगवेगळे पैसे जे आपण कापून घेतो, त्याचा विनियोग नेमका काय होतो? यासंदर्भातील माहिती घेतली पाहिजे, असं सर्वसमक्ष ठरलं होतं. त्यात आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकरता वर्षानुवर्ष एक रुपया कापून घेतो. त्यामुळे जसे इतरांनी त्या पैशाचे काय केले? याची माहिती मागितली. तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी वसंतदादा इन्स्टिट्यूटकडे मागितलेली आहे. त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी देखील होते. साखर कारखानदार देखील होते. सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागविण्यात आलेली आहे.
त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली. आमच्याकडे तक्रार आली आणि गंभीर असेल तर आम्ही चौकशी देखील करू. पण, अशी कुठली तक्रार देखील आलेली नाही. त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ काढला आहे. राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचा या मोर्चाला पाठिंबा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला बच्चू कडू यांच्यासह शिष्टमंडळ गेले नसल्याने ती बैठक रद्द करण्यात आली.
याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रात्री उशिरा एक वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की, आम्ही बैठकीला येणार असे म्हटले होते. पण, आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत. आम्ही तिथे नसलो तर त्यातून वेगळा संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे आम्ही आमचे मागणीपत्र तुम्हाला पाठवत आहोत. तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा. आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली आहे. त्यांच्या मागण्यांपैकी ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्यावर तातडीने निर्णय करता येतील, ते आम्ही करू, असे त्यांनी सांगितलं.
