पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. (Pune) त्यातच आता पोलिसांवरच हल्ल्यांच्या घटना घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे, याची झलक पुन्हा एकदा दिसली आहे. रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरात गुन्हे शाखा युनिट-३ मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल काटकर (बकल क्र. 7835) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना लॉ कॉलेज रोडसमोर घडली.
कुख्यात गुंड निलेश घायवळचा पाय खोलात; पुणे पोलिसांकडून घरावर छापेमारी, धक्कादायक माहिती समोर
मिळालेल्या माहितीनुसार काटकर हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रात्री सुमारे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यात त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
प्राथमिक तपासात ‘कट मारल्याच्या’ वादातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून डेक्कन पोलीस ठाण्याने त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.