पुणे: आदर्श घेऊन महापुरुषांचा, संकल्प करू स्वच्छतेचा! छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला कल्याणकारी राज्याचा वारसा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला देशसेवेचा संस्कार जपत, औंध-बोपोडी प्रभागात ‘महापुरुषांना स्वच्छांजली’ या अभिनव मोहिमेचा आज 16 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला. (pune Aundh-Bopodi division cleanliness campaign, initiative of corporator Sunny Nimhan)
प्रभाग क्रमांक आठचे नगरसेवक सनी निम्हण (Sunny Nimhan) यांच्या पुढाकाराने ही मोहीम शिवजयंती ते भीमजयंती (19 फेब्रुवारी ते 14 एप्रिल) या काळात राबवण्यात येणार आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादनच नव्हे, तर त्यांच्या विचारांतून कृतीशील स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर आणि नगरसेविका सपना छाझेड यांनी विशेष उपस्थिती दर्शवून मोहिमेत सहभाग घेतला. तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेवक आणि विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्वच्छतेचे काम करून या मोहिमेला बळ दिले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आपल्या महापुरुषांनी आपल्याला समाजसेवेचा आणि शिस्तीचा मार्ग दाखवला आहे. त्यांना खरी आदरांजली वाहण्यासाठी आम्ही ही ‘स्वच्छांजली’ मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहान नगरसेवक सनी निम्हण यांनी केले आहे.
नागरिकांच्या सहभागासाठी ‘QR कोड’ सुविधा
ही मोहीम केवळ सरकारी उपक्रम न राहता ती लोकचळवळ व्हावी, यासाठी नगरसेवक सनी निम्हण यांनी डिजिटल पाऊल उचलले आहे. प्रभागातील नागरिकांना आपल्या परिसरात कुठेही स्वच्छतेची आवश्यकता वाटल्यास, त्यांनी 8308123555 ह्या नंबर वर किंवा खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
QR कोड स्कॅन करा: मोहिमेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेला QR कोड स्कॅन करावा.
* माहिती पाठवा: स्वच्छतेची गरज असलेल्या जागेचा फोटो आणि लोकेशन पाठवावे.
* तात्काळ दखल: प्राप्त तक्रारीनुसार त्या जागेची तातडीने स्वच्छता करून प्रभाग स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी टीम तत्पर असेल.
