पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कसबा आणि चिंचवडसाठीचे आपले उमेदवार ठरले आहेत. यानुसार काँग्रेसने माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. एकंदरीत या निवडणुकीत अजित पवार यांनी शिवसेनेचा नेता आपल्याकडे खेचत भाजप समोर मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
धंगेकर यांनी यापूर्वी देखील कसब्यामध्ये निवडणूक लढवली होती. राहुल कलाटे यांनीही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना जोरदार टक्कर दिली होती. आता तीनही पक्ष एकत्र येऊन लढणार आल्यामुळे भाजपला कसून तयारी करावी लागणार आहे, एवढं नक्की. भाजपकडून चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा असून त्यांची समजूत काढण्यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा टिळक वाड्यात जाऊन त्यांची भेट घेतली.
मुक्ता टिळक यांची पती शैलेश आणि पुत्र कुणाल या दोघांपैकी कोणाला तरी उमेदवारी द्यावी अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र कसब्याचे गणित पाहता भाजपला येथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याशी सामना होणार आहे. त्यामुळे टिळक कुटुंबाऐवजी इतर नावांचा विचार भाजपा करत आहेत. कुणाल टिळक यांची राज्य प्रवक्ते पदी नियुक्ती करून टिळकांना इतरत्र सामावून घेण्याचा विचार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आता शैलेश टिळक यांची समजूत काढून पक्ष देईल. त्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती भाजपने त्यांनी केल्याची माहिती वरिष्ठ कार्यकर्त्यांनी दिली.