Pune Crime News vaishnavi Haghwane : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने (Vaishnavi Hagawane Case) आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर तिचा पती आणि राजेंद्र हगवणे दोघेही फरार आहेत. वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केला, असा आरोप सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर (Pune Crime) आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमधील कस्पटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सासरी असताना मुलीवर काय अन्याय झाला, सासरच्या लोकांनी तिला कसा त्रास दिला, लेकीचा संसार वाचवण्यासाठी काय प्रयत्न केला या सगळ्या प्रसंगांची हृदयद्रावक कहाणी वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली.
लग्न झाल्यानंतर वैष्णवीला सुखाचे दिवस कधी दिसलेच नाहीत. पाच ते सहा महिन्यांतच सासरच्या लोकांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. वैष्णवी कधीही घरी आली की म्हणायची पप्पा पैसे द्या. सासरच्यांनी तिला खूप मानसिक त्रास दिला. तिला घालायला साडी आणि ड्रेसही नसायचा. लग्नानंतर गौरी गणपतीच्या सणात तिच्या सासूने चांदीच्या गौरी मागितल्या. त्याही आम्ही दिल्या. दीड महिन्यांपूर्वी जावयाने माझ्याकडं दीड लाखांचा मोबाइल मागितला होता. तो देखील मी दिला.
फक्त वैष्णवीच नाही…मोठ्या सुनेचा देखील हगवणे कुटुंबाने केला छळ, कपडे फाटेपर्यंत अमानुष मारहाण
साडेसात किलो वजनाची चांदीची ताटं दिली. इतकंच नाही तर 51 तोळे सोनं आणि फॉर्च्यूनर गाडीही जावयाला दिली होती. आधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी दिली होती. वैष्णवी घरी आली की काहीतरी मागत असायची. दीड दोन महिन्यांनी वैष्णवी घरी आली की मी तिला 50 हजार, एक लाख रुपये देत असायचो असे सांगताना वैष्णवीच्या वडिलांचे डोळे पाणावले होते.
सासरच्या लोकांकडून वैष्णवीला सतत टॉर्चर केले जात होते. सासू तर तिला सतत टॉर्चर करत होती. तुला स्वयंपाक येत नाही. साफसफाई येत नाही असे सारखे म्हणायची. आम्ही विचारलं की आमच्याकडे कामाला तीन बाया आहेत तिला इथे काय काम पडतंय. पण, आम्ही गेलो की वैष्णवीला पुन्हा त्रास दिला जायचा. घरी आली की वैष्णवी आम्हाला सगळं सांगायची. दोन महिन्यांपूर्वी तिच्या नणंदेनं तिला खूप मारलं होतं.
तिच्या अंगावर थुंकलीही होती. त्या दोघी मायलेकींनी वैष्णवीला गाडीत घालून टॉर्चर करत बालेवाडीपयर्यंत आणलं होतं. घरी आल्यावर मी स्वतः सासू, वैष्णवीची नणंद आणि जावयाचे पाय धरले होते. माझ्या मुलीची काही चूक असेल तर माफ करा असं मी म्हणालो होतो. आम्ही मुलीचा संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न केला असे म्हणत वैष्णवीच्या वडिलांना हुंदका आवरेना.