पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला नाही… भाजप इच्छुकांमध्ये उत्साह

Legislative Council Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर

Legislative Council Election

Legislative Council Election

Legislative Council Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये देखील जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जागांवरुन चढाओढ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, नुकतंच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर असलेल्या संख्याबळावर महायुतीमध्ये (Mahayuti) प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली आहे. या चर्चेनुसार भाजप 12, शिवसेना शिंदे गट 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2 जागावर निवडणूक लढवू शकतो. तसेच काही जागांसाठी भाजप (BJP) , राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेत (Shivsena) अदलाबदल होण्याची देखील माहिती समोर येत आहे मात्र सध्या प्राथमिक चर्चा सुरु असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या बैठकीत जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

पुणेची जागा भाजपकडे जाणार ?

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्याची जागा आता भाजपकडे जाणार असल्याची चर्चा जोराने राजकीय वर्तुळात सुरु असल्याने भाजप इच्छुकांमध्ये उत्साहाचा वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातून कुणाला संधी देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

भाजपमधून कोण इच्छुक?

भाजपमध्ये गेल्या निवडणुकांमध्ये दिलेले ‘शब्द’ आणि आश्वासन पूर्ण करण्यासाठी नेत्यांचे डोळे या निवडणुकीकडे लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी टाळली होती, तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून त्यांच्या योग्य पुनर्वसनाचा शब्द दिला होता. त्यामुळे मुळीक समर्थक या जागेवर मोठा दावा करत आहेत. मुळीक यांच्याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपला जागा न सुटल्याने संधी हुकलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही या निवडणुकीसाठी मोठी तयारी सुरू केली आहे.

पुणे महापालिकेचे माजी गटनेते गणेश बिडकर यांनी आधीपासूनच या जागेसाठीची रणनीती आणि गणिते पक्की केली आहेत. तर, कसबा पेठ पोटनिवडणुकीवेळी शब्द मिळालेले भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि पक्षाचे सरचिटणीस राजेश पांडे यांच्याही नावाची पक्षांतर्गत चर्चा आहे.

कोणाकडे किती मते

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 322 मते

भारतीय जनता पक्ष (भाजप) : 296 मते

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : 70 मते

काँग्रेस :  19 मते

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 12 मते

अपक्ष आणि इतर पक्ष : 26 मते

राष्ट्रवादीकडे असलेली जागा यावेळी भाजपच्या निशाण्यावर; अहिल्यानगर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग

Exit mobile version