Pune Lok Sabha Election BJP candidate Murlidhar Mohol asset : पुणे लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) भाजपचे (BJP) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी महायुतीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. उमेदवारी अर्जाबरोबर मुरलीधर मोहोळ यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. पुण्याचे माजी महापौर राहिलेले मुरलीधर मोहोळ हे कोट्यधीश आहेत. तसेच त्यांच्यावर व्यवसायसाठी घेतलेल्या बँकांचे व वैयक्तिक कर्ज आहेत. ते बांधकाम व्यवसायात आहेत.
मुरलीधर मोहोळ, त्यांची पत्नी मोनिका व दोन मुली सिध्दी व सौम्या यांच्याकडून मिळून 24 कोटी 32 लाख 44 हजार 103 इतके संपत्ती आहे. त्यात
5 कोटी 26 लाख 76 हजार 788 जंगम मालमत्ता आहे. मोहोळ कुटुंबाकडे 410 ग्रॅम इतके सोने आहेत. त्यास मुरलीधर मोहोळ यांच्याकडे शंभर ग्रॅम, त्यांच्या पत्नीकडे 250 ग्रॅम आणि दोन्ही मुलींकडे 60 ग्रॅम सोने आहेत. पुण्यातील मुळशी तालुक्यात व सातारा जिल्हयात एका ठिकाणी असे आठ ठिकाणी शेतजमिनी आहेत. तर पुण्यात वाणिज्य इमारती आणि दोन ठिकाणी निवासी घर अशी मालमत्ता आहे. एकूण 19 कोटी 5 लाख 67 हजार 315 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सहकारी, खासगी बँक आणि व्यक्तींकडून घेतलेले असे 14 कोटी 85 लाखांचे कर्ज त्यांच्याकडे आहे.
कंट्रक्शन कंपन्यांमध्ये भागिदारी
मुरलीधर मोहोळ यांच्याकडे 9 हजार 112 रुपये, तर पत्नी मोनिका यांच्याकडे 12 हजार 124 रोख रक्कम आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर 66 लाख 74 हजार इतक्या ठेवी आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 2 लाख 71 हजार 273 ठेवी आहेत. वेगवेगळ्या कन्ट्रक्शन कंपन्यांमध्ये त्यांची 3 कोटी 96 लाख इतकी गुंतवणूक आहे. तसेच काही जणांना मोहोळ यांनी कर्ज दिलेले आहे. मोहोळ यांच्याकडे 5 कोटी 41 लाख, तर पत्नीकडे 21 लाख 43 हजार इतकी जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे एक टोयाटो इनिव्हा आहे.
साताऱ्यात शेतजमिन
मोहोळ यांच्या नावावर मुळशी तालु्क्यातील मुठा, कासार आंबोली, भूगावमध्ये तीन ठिकाणी, दासवे, मुळशी येथे एक ठिकाण शेतजमिन आहे. त्यातील काही शेतजमिन वडिलोपार्जित आहे. तर काही जमिन त्यांनी खरेदी केली. सातारा जिल्ह्यातील वाईतील येरुली गावात त्यांची 3 एकर 18 आर इतकी शेत जमिन आहे. कोथरुड येथे दोन ठिकाणी वाणिज्यिक इमारती आहेत. तर दोन निवासी घरे आहेत. कोथरुड भागात एक बंगला आणि एक प्लॅट आहे.
मुरलीधर मोहोळांकडून पत्नीला कर्ज
वेगवेगळ्या बँका व खासगी व्यक्तींकडून घेतलेले कर्ज असे 13 कोटी 58 लाख रुपये कर्ज मोहोळ यांच्याकडे आहे. तर त्यांची पत्नी मोनिका यांच्यावर 1 कोटी 26 लाखांचे कर्ज आहे. त्यात मुरलीधर मोहोळ यांनी पत्नीला 34 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज दिलेले आहे.