पुणे : भाजपचे पुण्याचे खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीची (Pune Lok Sabha byelection) तयारी सुरु झाली आहे. प्रशासन मागील 17 दिवसांपासून लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट मशीन्स आणि इतर गोष्टींची तयारी करत आहे. याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मतदान साहित्यासह इतर अनुषंगिक माहिती सादर करण्याबाबत पत्र पाठविले आहे. (Pune Lok Sabha byelection may declare soon election commission Congress NCP BJP)
या पोनिवडणुकीसाठी कर्नाटक निवडणूक संपन्न झाल्यानंतर बंगळुरूहून पुण्याला 4 हजार 200 मतदान यंत्रे आणि 5 हजार 70 व्हीव्हीपँट मशिन्स दाखल झाली आहेत. या मशिन्सवर पुणे पोटनिवडणूक (Pune By Election) असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. यासोबतच 30 इंजिनिअर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार याद्या अद्यायावत करणे आणि मतदान केंद्रे निश्चित करण्याची काम पण पूर्ण झाली आहेत.
भाजपकडून गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे, मेधा कुलकर्णी आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी स्वरदा बापट यांच्या नावावर भाजकडून एक मत होऊ शकते, अशी चर्चा आहे. लेट्सअप मराठीशी बोलताना स्वरदा बापट यांनी पक्षाने संधी दिली तर पुणे लोकसभा लढवू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. तर जगदीश मुळीक यांनी देखील ही जागा लढविण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. “पक्षाने पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी संधी दिली तर त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास केला.
दरम्यान, पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे. मात्र, ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडावी असं जाहीर आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलं आहे. पुण्याच्या बदल्यात काँग्रेसला राज्यातील दुसरी जागा देण्याचा राष्ट्रवादी विचार करत असल्याचे मत जगताप यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप आणि दीपक मानकर यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय रुपाली पाटील-ठोंबरे यांनीही इच्छा व्यक्त केली आहे.