पुणे : पुणे महापालिका (Municipal Corporation) हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. २९ डिसेंबर २०१७ मध्ये चंदननगर भागामध्ये एका दीड वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. यामध्ये त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती. तसेच १० फेब्रुवारी २०२३ मध्ये ब्रम्हा सनसिटी या सोसायटीमध्ये चार- पाच कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला होता. पुणे शहरात (Pune City) सुमारे साडेतीन लाख भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. तर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे (Mla Sunil Tingre) यांनी केली.
२०२२ या वर्षात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या १३ हजार १४८ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहेे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही अत्यंत गंभीर बाब मी अधिवेशनात (Convention) सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन श्वान नसबंदीचा वेग वाढविणे, कुत्र्यांसाठी शेल्टरची व्यवस्था करणे तसेच हौसिंग सोसाट्यांमध्ये कुत्री पाळण्यासंदर्भात नियमावली तयार करावी, अशी मागणी केली.
काही दिवसांपूर्वी खराडीतील ब्रह्मा स्काय सिटी सोसायटीमध्ये मानीत गाडेकर हा खेळताना त्याच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. अशा अनेक घटना खराडी, चंदन नगर, वडगावशेरीसह संपूर्ण शहरात घडत आहेत. पुण्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे साडेतीन लाख असून, गेल्या वर्षभरात १६ हजार ५६९ लोकांना कुत्र्यांनी चावले आहे. तर महापालिकेला एका वर्षात केवळ १७ हजार १७८ कुत्र्यांची नसबंदी करता आली असून हे प्रमाण खूप कमी आहे.
पुणे शहरात अनेक ठिकाणी सोसायटीमधील नागरिक रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला देत आहे, हेच कुत्रे पुढे त्रासदायक ठरत आहेत. पण हे नागरिक याचा विचार करत नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कडक नियमावली तयार केली पाहिजे, अशी मागणी टिंगरे यांनी सभागृहात केली. यावर समिती स्थापन करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले, असे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले.