प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. एस. हिरेमठ यांचं निधन; वैद्यकीय क्षेत्रात शोककळा

पुण्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. एस. हिरेमठ यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं असल्याची माहिती समोर आलीयं.

Hiremath

Hiremath

Dr. M.S. hiremath : पुण्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. एस. हिरेमठ (Dr. M.S. hiremath) यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वस्थ्याशी लढा देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी लीना हिरेमठ आणि परिवार आहे. त्यांच्या निधनाने पुणे आणि महाराष्ट्राच्या वैद्यकीय विश्वात, विशेषतः हृदयरोग उपचारांच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वस्तरातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील दैदिप्यमान प्रवास
डॉ. हिरेमठ यांचा जन्म १७ जुलै १९५१ रोजी झाला. त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि एमडी पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून कार्डिओलॉजीमध्ये ‘डीएम’ (DM) पूर्ण करून १९८२ पासून त्यांनी पुण्यात वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. जोशी हॉस्पिटल आणि त्यानंतर रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) मध्ये कॅथ लॅबचे संचालक म्हणून त्यांनी चार दशकांहून अधिक काळ रुग्णसेवा केली. याशिवाय औंध इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIMS) चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

तंत्रज्ञान आणि उपचारांमधील आद्य प्रवर्तक
आपल्या कारकिर्दीत त्यांनी ४०,००० हून अधिक अँजिओप्लास्टी आणि १,००,००० पेक्षा जास्त अँजिओग्राफी यशस्वीपणे पार पाडल्या. पुण्यात सर्वप्रथम ड्युअल चेंबर पेसमेकर, पल्मोनरी बलून मिट्रल व्हॅल्व्होप्लास्टी, कोरोनरी स्टेंट आणि भारतात पहिल्यांदा कॅरोटिड आर्टरी वॉल स्टेंट बसवण्याचा बहुमान त्यांच्या नावे आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेतृत्व
ते कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (CSI) चे राष्ट्रीय अध्यक्ष (२०१६-२०१७) आणि ‘नॅशनल इंटरव्हेंशन कौन्सिल’चे (NIC) अध्यक्ष राहिले होते. ‘सन ऑफ द सॉइल’ आणि ‘जेंटलमन ऑफ द इयर’ यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी देशभरातील शेकडो तरुण डॉक्टरांना मार्गदर्शन करून तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्टची नवी पिढी घडवली.

Exit mobile version