Download App

माझिरेंचा मनसेनंतर आता शिंदेंनाही दे धक्का; राजीनाम्याच्या तयारीत

Nilesh Mazire News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपासून शिंदे गटालाही (Eknath Shinde Group) कार्यकर्ते सोडून जात असल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता पुण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. जिल्हा माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे (Nilesh Mazire) आपल्या समर्थकांसह राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे.

अजितदादांवरील बायोपिकचा नायक कोण? उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं ‘या’ अभिनेत्याचं नाव

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीचं निमंत्रण महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांना देण्यात आलं होतं. यावेळी पुण्यातील महायुतीचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. जिल्हा माथाडी कामगार सेनेचे निलेश माझिरे यांनीही हजेरी लावली खरी मात्र, त्यांच्याशी वरिष्ठ नेत्यांनी संवाद साधला नाही. त्यामुळे नाराज होऊन आता माझिरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

‘संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन केलं होतं का? फडणवीसांचा थेट सवाल

शिवेसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दीड वर्षांपूर्वीच निलेश माझिरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून शिंदेंच्या गोठ्यात सामील झाले होते. ते मनसेचे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र, काही कारणास्तव त्यांनी मनसे सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. आता ते शिंदे गट सोडण्याच्या तयारीत आहेत.

नाराजीवर बोलताना निलेश माझिरे म्हणाले, पुण्यात महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीची साधी कल्पनाही कार्यकर्त्यांना देण्यात आली नव्हती. मुंबईतून वरिष्ठ नेते बैठकीसाठी आले होते. आम्हीही या बैठकीला कार्यकर्ते घेऊन गेलो मात्र, आम्हाला बैठकीसाठी डावलण्यात आलं. पक्षप्रवेश केला त्यावेळचा मान सन्मान आम्हाला दिला गेला नाही. पुढील दोन दिवसांत मी पक्षश्रेष्ठींकडे माझ्यासह कार्यकर्त्यांचा राजीनामा पाठवणार असल्याचं माझिरेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, निलेश माझिरे पुण्यात एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते मनसे, शिंदेंच्या शिवसेनेत काम करीत आहेत. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंची साथ सोडण्याच्या निर्णयाने पुण्यात शिंदेंना मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. शिंदेंची शिवसेना सोडल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत अद्याप माझिरेंनी स्पष्ट केलं नसून ते पुढील काळात स्पष्ट होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

follow us