पुणे : भाजपचे दिवंगत नेते लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीनं (Vidhansabha Election) महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं. आता हाच मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Rockstar DSP : रॉकस्टार डीएसपी आणि शिल्पा राव एका नव्या चार्टबस्टरसाठी येणार एकत्र?
अश्विनी जगताप तुतारी हाती घेणार?
या मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आणि अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळं चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्या आपल्या काही समर्थक नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होतील आणि तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील,अशी सूत्रांची माहिती आहे.
शंकर जगतापांची निवडणूक लढण्याची इच्छा…
पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप यांना भाजपकडून संधी देण्यात आली होती. त्यांनी या निवडणुकीमध्ये सुमारे 36 हजाराच्या फरकाने एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला होता. आता पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांचेच दिर आणि भाजप शहराध्यक्ष असलेले शंकर जगताप यांनी देखील विधानसभेची इच्छा व्यक्त केल्याने जगताप कुटुंबातच गृहकलह पाहायला मिळतोय.
सोबतच भाजपकडून देखील शंकर जगताप यांना झुकतं माप देण्यात येत असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यामुळेच अश्विनी जगताप ह्या पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
मविआत चिंचवडची जागा कुणाला?
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, ज्या मित्र पक्षाचा विद्यमान आमदार त्याच पक्षाला त्या ठिकाणचे तिकीट, असा अघोषित नियम आहे. या नियमानुसार भाजपला चिंचवड मतदारसंघ मिळणार हे नक्की. मात्र महाविकास आघाडीकडून कोणाला जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी देखील या मतदारसंघावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रबळ दावा असून त्यांनाच ही जागा सुटेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच त्या दृष्टीने पवारांनी देखील आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे.
पवारांना उमेदवार आयात करावा लागणार
आजघडीला चिंचवड विधानसभा मतदारसंघात शरद पवारांकडे उमेदवार म्हणून तगडा कुठलाही राजकीय नेता दिसत नाही. पोटनिवडणुकीत ज्या नाना काटेंनी अश्विनी जगताप आणि भाजपला मोठी टक्कर दिली होती, ते आजघडीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे पवारांना चिंचवडमध्ये उमेदवार आयात करावा लागणारस हे मात्र नक्की आहे.
काटे शरद पवार गटात जाणार की अपक्ष लढणार?
दुसरीकडे काहीही झालं तरी आपण निवडणूक लढवणार या भूमिकेवर काटे देखील ठाम असल्याने ऐनवेळी काटे काय चाल खेळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधूनमधून अशाही चर्चा होतात की, नाना काटे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील आणि तेच तुतारीवर निवडणूक लढतील. मात्र निवडणूक तोंडावर आली असता अद्यापही काटेंनी आपले पत्ते उघड केले नाही. त्यामुळं पवारांनी थेट अश्विनी जगताप यांनाच ऑफर दिल्याची माहिती मिळतेय.
अश्विनी जगतापांना उत्तम जनाधार…
चिंचवड विधानसभा मतदारसंघात दिवंगत भाजप नेते लक्ष्मण जगताप यांनी मोठी ताकद निर्माण केली असून जगताप कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघांमध्ये आहे. सोबतच भाजपची पक्ष म्हणून देखील या मतदारसंघावर चांगली पकड आहे. याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेला लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना मिळालेल्या लीड वरून लक्षात येतो. त्यामुळे चिंचवड सर करायचा झाल्यास जगताप कुटुंबियांच्या ताकतीची गरज महत्त्वाची आहे. आजही लक्ष्मण जगताप यांना मानणारा मोठा वर्ग अश्विनी जगताप यांच्या पाठीशी असल्याने पवारांनी अश्विनी जगताप यांना ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, महायुतीकडून भाजपला जागा सुटली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांना युतीधर्म पाळत भाजप उमेदवाराचे काम करावे लागणार आहे. काटेंना निवडणूक लढवायचीचं झाल्यास अपक्ष निवडणूक लढवावी लागेल आणि याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची जास्त शक्यता आहे.
अश्विनी जगताप यांनी तुतारी फुंकली अन् भाजपकडून शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत पाहायला मिळेल. सोबतच नाना काटे, राहुल कलाटे या मंडळींची भूमिका निवडणूक निकालावर परिणाम टाकणारी आहेत. त्यामुळे ही मंडळी काय भूमिका घेते, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.