Law Collage Area More Expensive Then Koregaon Park : स्वत:चं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण पुणेकरांचं हेच स्वप्न आता महाग झालंय. याला कारण ठरतीय ती…रेडीरेकनरमध्ये झालेली वाढ. आतापर्यंत पुणे शहरातील सर्वाधिक हाय प्रोफाईल एरिया म्हणजे कोरेगाव पार्क. हे पुण्यातील (Pune) सर्वात आलिशान परिसरांपैकी एक. टॉप क्लास रेस्टॉरंट्स आणि पब, आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सान्निध्य, आयटी केंद्रे आणि बरेच काही…यामुळं एक महागडा परिसर म्हणून कोरेगाव पार्ककडे (Pune Houses Prices) पाहिलं जायचं. पण याच ट्रेंडी परिसराला लॉ कॉलेज रोड भारी पडलाय. राज्यात रेडीरेकनरच्या (Ready Reckoner Rate) किमती जाहीर झाल्यानंतर शैक्षणिक सानिध्य असलेल्या लॉ कॉलेज रोडने बाजी मारली… पुण्यात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत…शहरात कोणत्या भागात घरांच्या काय किमती आहेत, ते पाहू या…
रेडी रेकनर रेट म्हणजे काय?
रेडी रेकनर रेट वाढल्यामुळं घरांच्या किमती वाढल्यात. परंतु रेडी रेकनर रेट म्हणजे काय? तर जमीन, व्यावसायिक आणि निवासी यांसारख्या रिअल इस्टेट मालमत्तेचे राज्य सरकारद्वारे नियमन केलेले आणि मूल्यांकन केलेले एक मानक मूल्य म्हणजे रेडी रेकनर रेट. नुकतेच रेडी रेकनरचे दर जाहीर झालेत. पुणे शहरात रेडी रेकनरचा दर 4.16 टक्के तर पिंपरी-चिंचवडमध्ये 6.69 टक्के आहे. रेडी रेकनरच्या दरवाढीचा थेट परिणाम घरं, मोकळी जागा, दुकान खरेदीवर होणार आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख भागातील रेडीरेकनरचा प्रतिचौरस फुटांचा दर किती असेल, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलीय.
मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; मनोज जरांगेंचा सहकारी मुख्य आरोपी
सर्वात महाग घरे लॉ कॉलेज रस्त्यावर
याच शर्यतीत लॉ कॉलेज रोड परिसराने यंदा कोरेगाव पार्क परिसरालाही मागं टाकलंय. सर्वात महाग घरे लॉ कॉलेज रस्त्यावर असल्याचं समोर आलंय. इथली घरं का भाव खात आहेत? तर पंचतारांकित हॉटेल्स, आयसीआयसीआय अन् सिम्बॉयसीस…सेनापती बापट रोड नव्याने डेव्हलप होतोय. पुणे शहरात जाण्यास तेथून सुरूवात होते. त्यामुळे लॉ कॉलेज रोडवरील घरं जास्तच महाग आहेत. रेडीरेकनरच्या दरानुसार या परिसरातील हजार चौरस फुटांच्या घराची किंमत किमान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यावरील इतर शुल्कांचा विचार केल्यास ही किंमत दोन कोटींचा टप्पा पार करील. येथील प्रतिचौरस फुटांचा दर 16 हजार 816 रुपये तर कोरेगाव पार्क परिसराचा प्रतिचौरस फुटांचा दर 16 हजार 681 एवढा आहे.
फडणवीसांना मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही… हिंदुत्वाच्या मुद्यावरून संजय राऊतांचा प्रहार
शहरातील प्रमुख भागातील रेडीरेकनरचा दर
प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील घरांसाठी 15 हजार 355 रुपये प्रतिचौरस फुटांप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. गरवारे हायस्कूल ते एसएनडीटी, कर्वे रस्त्यांवरील मालमत्ता प्रतिचौरस फूट 14 हजार रुपयांपेक्षा जास्त दर…तर ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावरील सदनिकांचे दर 12 हजार रुपये प्रतिचौरस फूट आहेत. गोखले चौक ते बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्त्यावरील सदनिकांचे प्रतिचौरस फूट दर 10 हजारांपेक्षा जास्त आहेत.पुण्यात सर्वात कमी दर नांदोशी आणि किरकिटवाडी भागात आहे. कारण ते पुण्यातील सिंहगड रस्त्यावर येतात. नांदोशीमध्ये प्रतिचौरस फुटांचा दर 3 हजार 215 तर किरकिटवाडीत 2 हजार 931 रुपये प्रतिचौरस फूट आहे.
मेट्रो धावली अन् घरं महागली…
पुणे शहरात मेट्रो धावली अन् घरांच्या किमती वाढल्या, अशी परिस्थिती आहे. वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेवर आता मेट्रो पूर्ण क्षमतेने धावतेय. या मार्गिकच्या दोन्ही बाजूच्या 500 ते 1 हजार मीटर परिसरातील घरांचे दर गगनाला भिडलेत. एरंडवणा येथील कांचनगल्ली आणि अशोक पथ परिसर सर्वांत महागडा ठरला आहे. या भागात प्रतिचौरस फूट दर १९ हजार ४०० रुपयांवर गेला आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर प्रभात रस्त्यावरील काशिनाथशास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक 15), तिसऱ्या क्रमांकावर प्रभात, भांडारकर आणि लॉ कॉलेज रोड परिसर आहे. मॉडेल कॉलनी, जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता ते गणेशखिंड रस्ता, घोले रस्ता, कल्याणीनगर, कर्वे रस्ता या परिसरातील दर तेजीत आहेत.
बांधकाम व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया
शहरात रेडीरेकनरचे दर सरासरी पाच टक्के वाढले आहेत. याचा थेट परिणाम मुद्रांक शुल्क, जमीन दर आणि अपार्टमेंटच्या किमतीवर होताना दिसतोय. शासनाच्या निर्बंधांमुळे विकासकांना रेडीरेकनर दराखाली विक्री करता येत नाही. असं केलं, तर अतिरिक्त कर लागू शकतो. मागील तीन वर्षांमध्ये रेडीरेकनरचा दर स्थिर होता. त्यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राला स्थिरता मिळाली. मात्र, रेडीरेकनरचे दर वाढल्यामुळे पुण्यातील घरांच्या किमती सातत्याने वाढतच राहतील, यामध्ये मात्र शंका नाही, असं पुणे क्रेडाई अध्यक्ष मनिष जैन यांनी म्हटलंय.
सन 2020 पासून प्रत्येक मान्यता, मंजुरी आणि शुल्क रेडीरेकनरच्या दराशी संलग्न असल्यामुळे बांधकामाचा खर्च वाढणार आहे. रेडीरेकनरचे दर वाढल्याने मुद्रांक शुल्क, महापालिकेच्या अन्य करातही वाढ होणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांपुढेही अडचणी निर्माण होणार आहे. सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्नही लांब राहण्याची शक्यता आहे. सरकारने विशिष्ट क्षेत्रफळाच्या सदनिकांना स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आदींमध्ये सवलत दिली, तर ते योग्य होईल, असं मराठी बांधकाम व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष नितीन देशपांडे यांनी म्हटलंय.