Pune Sasoon Hospital : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात राजकीय पुढारी यांच्याबरोबर आता प्रशासकीय अधिकारी यांना धमकी आणि फेक कॉलचे सत्र सुरु झाले आहे. गेल्या महिन्याभरात भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे खंडणी, तर भाजपचे पुणे महापालिकेचे माजी गटनेते गणेश बीडकर यांनाच २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. धमकी, फेक कॉलचे हे सत्र अद्याप थांबायचे नाव घेत नसून आता प्रशासकीय अधिकारी यांना देखील फेक फोन कॉल करुन दमात घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण शहरातील ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना फेक कॉल आल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतोय, असे सांगत ससूनमधील सुरू असलेल्या कँन्टीनचे (मेस) दुसरे टेंडर भरा, असा धमकीवजा आदेश देणारा हा फोन करण्यात आला आहे. डॉ. ठाकूर यांना लँण्डलाइनवरून हा फोन करण्यात आला होता. या फोननंतर काही वेळासाठी ससून रुग्णालयात खळबळ उडाली होती. मात्र, ससूनचे डीन यांनी अद्याप याबाबत पोलिसांमध्य तक्रार केलेली नाही.
ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना फोन करणारा तब्बल पाच मिनिटे बोलत होता. त्या व्यक्तीने डॉ. ठाकूर यांच्याकडून आधी सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर डॉ. ठाकूर यांना काही सूचना देखील केल्या आहेत. हा फोन झाल्यानंतर काही वेळाने डॉ. ठाकूर यांना या फोन कॉलबाबत संशय आला. त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयात फोन करुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना हा फेक कॉल असल्याच लक्षात आले. परंतु, डॉ. ठाकूर यांनी याप्रकरणी अद्याप याबाबतची माहिती पोलिसांनी दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.