Download App

PM मोदींसोबत व्यासपीठावर जाणारच! पवारांचा ‘मविआ’लाच धक्का; शिष्टमंडळाला भेटायलाही नकार

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर जाण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठाम आहेत. याशिवाय या कार्यक्रमात पवार यांनी सहभागी होऊ नये, अशी मागणी करणाऱ्या शिष्टमंडळाला भेटण्यासही त्यांनी नकार दिला असल्याची माहिती आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पवार यांना भेटायला जाणार होते. दरम्यान, पवार यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना (UBT) आणि काँग्रेसचे नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

Manipur Violence : मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; महिला अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने’ त्यांना गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मात्र ज्यांनी राष्ट्रवादीला फोडलं त्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला पवारांनी उपस्थित राहु नये अशी मागणी खुद्द पवारांच्या गटातूनच होतं होती.

शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनीही पवार यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत शरद पवार यांचा अजित पवारांना पाठिंबा आहे, असा संदेश जाईल अशी भूमिका मांडली होती. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये आणि मोदींसोबत व्यासपीठावर उपस्थित राहु नये, अशी मागणी करत बाबा आढाव यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे नेते पवारांची भेट घेणार होते. मात्र शरद पवार या कार्यक्रमासाठी जाण्यावर ठाम असल्याची माहिती समजल्यानंतर आता ते भेटीसाठी जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच ‘कलम 353’ हटविणार? कर्मचारी संघटना आक्रमक

महाविकास आघाडीमध्ये नाराजी :

एका बाजूला शरद पवार नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर दिसणार असतानाच महाविकास आघाडीकडून मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्याला जोरदार विरोध केला जाणार आहे. तर पवारांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. देशात मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पण सरकारकडून कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर करण्यात आली नाही. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून विरोधी पक्षांचे एक शिष्टमंडळ नुकतेच मणिपूरला गेले होते. देशभरात विरोधी पक्षांकडून पंतप्रधान मोदींना जोरदार विरोध सुरु असताना शरद पवार त्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने पवारांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us