Pune Toxic Liqor Case Main accused arrested : पुणे विषारी दारू प्रकरणात मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंह अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू असून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, कारण काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणाचा तपास सध्या युद्धपातळीवर सुरू असून पोलीस आणि अबकारी विभाग संयुक्तपणे कारवाई करत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. संशयित ठिकाणांवर पोलिसांनी धाड टाकून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याआधी योगेश वानखेडे या आरोपीला अटक करण्यात आली होती. आता मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या कर्नल विरखा सिंहलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्यासोबत आणखी 8 जणांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींवर कठोर कलमे लावण्यात आली आहेत.
पोलिसांनी रात्रभर दारूच्या अड्ड्यांवर धाडसत्र सुरू ठेवले. पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरातील अनेक भागांमध्ये छापेमारी करून अवैध दारू विक्री करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे. ही विषारी दारू नेमकी कुठे तयार करण्यात आली? तिचा पुरवठा कुठून झाला? याचा तपास केला जात आहे. काही ठिकाणी रासायनिक मिश्रण करून बनावट दारू तयार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फॉरेन्सिक तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
पुणे हादरलं! पिंपरी चिंचवड ते हडपसर विषारी दारूमुळे 13 जणांचा संशयास्पद मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांकडून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू करण्यात आला आहे. अवैध दारू विक्रीचे नेटवर्क किती मोठे आहे? त्यामागे आणखी कोणाचा हात आहे? याचाही शोध घेतला जात आहे. आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तातडीने दखल घेत पोलीस आयुक्तांशी थेट संपर्क साधला. एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्यातील अवैध दारू विक्रीवर व्यापक मोहीम राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं समजत आहे.
घटनेनंतर आरोग्य विभागही सतर्क झाला असून विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक कुटुंबांचा आधार हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी अवैध दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. आता पोलिसांच्या तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, तसेच या प्रकरणात आणखी किती मोठ्या लोकांचा सहभाग उघड होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
