FDA Suspended Pune’s Vaishali & Rupali Hotel License : पुणेकरांच्या आणि खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या एफ. सी. रोडवरील सुप्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याचे तपासणीत समोर आल्यानंतर FDA प्रशासनाने हा दणका दिला आहे. तसेच विक्री-पार्सल आणि होम डिलिव्हरीवर बंदी घालण्यात आली आहे. FDA च्या तपासणीवेळी हॉटेल वैशालीला केवळ 98 पैकी 58 गुण मिळाले.
हॉटेल वैशालीला केवळ 58 गुण
अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य सुभाष उमाप यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी हॉटेल वैशालीची सखोल तपासणी केली. या तपासणीत ९८ पैकी केवळ ५८ गुण मिळाल्याने हॉटेलचा निकाल ‘नॉन-कम्प्लायन्स’ (नियमबाह्य) असा नोंदवण्यात आला. यापूर्वी जून २०२६ मध्येही या हॉटेलला सुधारणा नोटीस देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने सहायक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रान हाश्मी यांनी परवाना (क्र. ११५२४०३५०००३९५) निलंबित करण्याचे आदेश दिले.
वैशाली हॉटेलमध्ये आढळलेल्या धक्कादायक त्रुटी
– स्वच्छतागृहांलगत अन्नप्रक्रिया : स्वयंपाकघरात जागा अपुरी असल्याने कच्चा माल ठेवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाजवळ, तर डोसा व उत्तप्पा बनवण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या अगदी लगत ठेवण्यात आला होता. तसेच, धुतलेली भांडी स्वच्छतागृहासमोरील टेबलावर आढळली.
– उघड्यावर अन्न साठवणूक : उकडलेले बटाटे, शिजवलेला भात व इतर तयार पदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवले होते. इडली व डोसा पीठ (बॅटर) तयार करण्याची प्रक्रियाही उघड्या जागेत सुरू होती.
– दूषित होण्याचा धोका : कच्च्या कापलेल्या भाज्या थेट तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवल्याने ‘क्रॉस-कंटॅमिनेशन’चा (अन्न दूषित होण्याचा) धोका निर्माण झाला होता.
– इतर त्रुटी : स्वयंपाकघराला कीटकप्रतिबंधक दरवाजे नसणे, तापमान नोंदी व पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत चाचणी अहवाल नसणे आणि तपासणीवेळी प्रशिक्षित (FoSTaC) पर्यवेक्षक गैरहजर असणे या गंभीर बाबी समोर आल्या.
रूपाली रेस्टॉरंटमधील प्रमुख त्रुटी :
अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. झांजुर्णे यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रूपाली रेस्टॉरंटची तपासणी केली. सुनावणीनंतर या रेस्टॉरंटचाही परवाना निलंबित करण्यात आला.
– असुरक्षित स्वयंपाकघर : स्वयंपाकघर उघडे असल्याने त्यामध्ये धूळ, घाण आणि कीटकांचा सहज प्रवेश होण्याचा धोका होता.
– अस्वच्छता : रेस्टॉरंट परिसरात पाणी साचलेले होते, तसेच साफसफाईचा अभाव व कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन आढळून आले.
– अयोग्य साठवणूक : कच्चा माल व तयार अन्नपदार्थ न झाकता तसेच ‘यूज बाय’ (वापरण्याची अंतिम मुदत) तारखेच्या लेबलशिवाय साठवले होते.
– कागदपत्रांचा अभाव : कच्चे व तयार अन्न वेगळे न ठेवणे, तापमान नोंदी नसणे आणि आवश्यक सुरक्षा व प्रशिक्षण नोंदींचा (FSMS प्लॅन, SOPs) अभाव आढळून आला.
प्रशासनाचा सक्त इशारा सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार ही कारवाई पार पडली. जोपर्यंत दोन्ही आस्थापना सर्व त्रुटी दूर करून पुनर्तपासणीत अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करत नाहीत आणि विभागाची लेखी परवानगी मिळवत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय—ज्यामध्ये प्रत्यक्ष विक्री, पार्सल किंवा होम डिलिव्हरीचाही समावेश आहे—करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
