ब्रेकिंग : पुणेकरांच्या आवडत्या हॉटेल वैशाली-रूपालीचे परवाने रद्द; विक्री-पार्सल होम डिलिव्हरीवर बंदी
pune vaishali rupali hotel पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली-रूपालीचे परवाने रद्द, विक्री-पार्सल आणि होम डिलिव्हरीवरही बंदी
FDA Suspended Pune’s Vaishali & Rupali Hotel License : पुणेकरांच्या आणि खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या एफ. सी. रोडवरील सुप्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रूपाली रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याचे तपासणीत समोर आल्यानंतर FDA प्रशासनाने हा दणका दिला आहे. तसेच विक्री-पार्सल आणि होम डिलिव्हरीवर बंदी घालण्यात आली आहे. FDA च्या तपासणीवेळी हॉटेल वैशालीला केवळ 98 पैकी 58 गुण मिळाले.
वैशालीच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 98 पैकी केवळ 58 गुण
अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य सुभाष उमाप यांनी 13 नोव्हेंबर 2026 रोजी हॉटेल वैशालीची तपासणी केली. या तपासणीत हॉटेलला 98 पैकी केवळ 58 गुण मिळाले. त्यामुळे हॉटेलचा दर्जा ‘नॉन-कम्प्लायन्स’ अर्थात नियमांचे पालन न करणारा असा नोंदवण्यात आला. यापूर्वी जून 2026 मध्येही हॉटेलला सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही आवश्यक सुधारणा न झाल्याने सहायक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रान हाश्मी यांनी हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले.
स्वच्छतागृहाजवळ डोसा-उत्तप्प्याची तयारी
वैशालीच्या तपासणीत समोर आलेल्या बाबी अधिक धक्कादायक आहेत. स्वयंपाकघरात जागा अपुरी असल्याने कच्चा माल ठेवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाजवळ ठेवण्यात आले होते. तर डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या अगदी जवळ आढळला. धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवण्यात आली होती.
इतकेच नव्हे, तर उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि इतर तयार पदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवण्यात आले होते. इडली आणि डोशाचे पीठ तयार करण्याची प्रक्रियाही उघड्या जागेत सुरू होती. कच्च्या कापलेल्या भाज्या तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवल्याने अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण झाला होता. स्वयंपाकघरात कीटकप्रतिबंधक दरवाजे नसणे, तापमानाच्या नोंदी उपलब्ध नसणे, पिण्याच्या पाण्याच्या चाचणीचा अद्ययावत अहवाल नसणे आणि प्रशिक्षित FoSTaC पर्यवेक्षक अनुपस्थित असणे, अशा त्रुटीही तपासणीत आढळल्या.
रूपाली रेस्टॉरंटवरही कारवाई; अनेक नियमांचे उल्लंघन
दुसरीकडे, अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. झांजुर्णे यांनी 13 नोव्हेंबर रोजी रूपाली रेस्टॉरंटची तपासणी केली. या तपासणीतही अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. सुनावणीनंतर प्रशासनाने रूपाली रेस्टॉरंटचाही परवाना निलंबित केला. रेस्टॉरंटचे स्वयंपाकघर उघडे असल्याने धूळ, घाण आणि कीटकांचा प्रवेश होण्याची शक्यता होती. परिसरात पाणी साचलेले होते, स्वच्छतेचा अभाव होता आणि कचऱ्याचे व्यवस्थापनही योग्य पद्धतीने केले जात नव्हते.
कच्चा माल आणि तयार अन्नपदार्थ झाकून ठेवलेले नव्हते. तसेच पदार्थांवर वापरण्याची अंतिम मुदत दर्शवणारी ‘यूज बाय’ तारीख असलेली लेबले नव्हती. कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवण्याची योग्य व्यवस्था, तापमानाच्या नोंदी, FSMS प्लॅन आणि SOPs यांसारख्या आवश्यक कागदपत्रांचाही अभाव आढळला.
विक्री-पार्सल आणि होम डिलिव्हरीवर बंदी
आयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही रेस्टॉरंटना सर्व त्रुटी दूर करून पुनर्तपासणीत अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करावी लागणार आहे. तसेच FDA विभागाची लेखी परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय सुरू करता येणार नाही. प्रत्यक्ष ग्राहकांना सेवा देणे, पार्सल विक्री आणि होम डिलिव्हरी या सर्वांवर बंदी लागू राहणार आहे.
हॉटेल वैशाली-रूपालीवरील कारवाई आदेश FDA