Pune Zilla Parishad Election: पुण्यातील वडगावशेरीचे विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार बापूसाहेब पठारे (MLA Bapusaheb Pathare) यांचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि सुनबाई ऐश्वर्या पठारे पुणे महापालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आता त्यांच्या दोन्ही मुली देखील जिल्हा परिषद (Pune Zilla Parishad Election) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यातून पठारे यांचे संपूर्ण कुटुंबच आता राजकारणात आलंय.
पठारे यांची एक मुलगी पूनम अमोल झेंडे पुरंदरमधील दिवे गराडे या गटातून राष्ट्रवादीकडून(अजित पवार) उभी आहे. पूनम झेंडे या आयपीएस अमोल झेंडे यांच्या पत्नी आहेत. ते पुण्यातच पीएमआरडीए क्षेत्राचे पोलिस अधीक्षक आहेत. त्यांच्या गाव परिसरातील दिवे गराडे गटातून त्या निवडणूक लढवत आहेत.
तर दुसरी मुलगी दिपाली राहुल गव्हाणे या शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.त्या डिंग्रजवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. तर आई प्रबोधिनी फाउंडेशन चालवितात. त्यांची पती राहुल गव्हाणे हे व्यावसायिक आहेत.
गव्हाणे यांच्यासमोर शिवसेनेच्या सारिका करपे आणि राष्ट्रवादीच्या(अजित पवार) रेखा बांदल यांच आव्हान असणार आहे. रेखा बांदल या पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी आहेत.
दरम्यान, बापूसाहेब पठारे हे स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत तर मुलगा आणि सूनबाई भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत आता त्यांच्या दोन्ही मुलीची जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजितदादांनी मिश्किल लगावला अन् तिकीटही दिले
पुणे महानगरपालिकेत वेगळं राजकीय राजकीय समीकरण पाहिला मिळलं. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मुलगा व सून हे भाजपमध्ये दाखल झाले आणि दोघेही निवडून आले आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांच्यावर जोरदार टीका झालीय. बापू फक्त शरीराने आमचे आमदार आहेत, मनाने कुठे आहेत ते सगळ्यांना ठाऊक आहे, असा मिश्किल टोला लगावला आहे. त्यांच्याच मुलीला दिवे गराडेमधून राष्ट्रवादीचे तिकीटही दिलंय.
