Rare cancer surgery successfully performed at ‘Apulki Medical Center’ patient gets new lease on life : शहरातील बाणेर स्थित ‘आपुलकी मेडिकल सेंटर’मध्ये ५० वर्षीय रुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ अशी ‘इंटरस्फिंक्टेरिक रिसेक्शन’ (Intersphincteric Resection) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. प्रसिद्ध सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ज्ञ) डॉ. राहुल पावशरे आणि त्यांच्या वैद्यकीय टीमने ही कामगिरी केली असून, यामुळे रुग्णाला कायमस्वरूपी कृत्रिम विष्ठेच्या पिशवीपासून (Permanent Stoma) मुक्ती मिळाली आहे.
काय होती रुग्णाची स्थिती?
संबंधित ५० वर्षीय पुरुष रुग्णाला गुदद्वाराच्या खालच्या भागात (Lower Rectum) दुसऱ्या टप्प्यातील (Second Stage) कर्करोग (Carcinoma) असल्याचे निदान झाले होते. गुदद्वारापासून अवघ्या १ ते २ सेंटीमीटर अंतरावर हा कॅन्सर होता. अशा प्रकारच्या रुग्णांवर उपचाराचा पहिला भाग म्हणून ‘नियोअज्युव्हंट केमो-रेडिएशन’ म्हणजेच केमोथेरपी आणि रेडिएशन उपचार दिले जातात. या रुग्णालाही हे उपचार देण्यात आले, ज्यामुळे कर्करोगाची गाठ आटोक्यात आणण्यात यश आले.
आव्हानात्मक शस्त्रक्रिया आणि आधुनिक तंत्रज्ञान
केमो-रेडिएशननंतर रुग्णावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. अनेक रुग्णालयांमध्ये अशा परिस्थितीत गुदद्वाराचा भाग पूर्णपणे काढून टाकावा लागतो आणि रुग्णाच्या पोटावर कायमस्वरूपी विष्ठेची पिशवी (Stoma) बसवावी लागते. यामुळे रुग्णाचे नैसर्गिक आयुष्य विस्कळीत होते.परंतु, डॉ. राहुल पावशरे यांनी रुग्णाच्या एमआरआय (MRI) आणि इतर तपासण्या करून एक धाडसी निर्णय घेतला.
तुमच्याही घरात नवं गर्भवती आहे? मग ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या…
त्यांनी आधुनिक ‘इंटरस्फिंक्टेरिक रिसेक्शन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले. मानवी शरीरात विष्ठा नियंत्रित करण्याची क्षमता ‘एक्सटर्नल स्फिंक्टर’ (External Sphincter) वर असते. या रुग्णाचा ‘इंटरनल स्फिंक्टर’ कर्करोगाने बाधित होता, परंतु एक्सटर्नल स्फिंक्टर सुरक्षित होता. डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने, दोन्ही स्फिंक्टरमधील अवघ्या २ ते ५ मिलीमीटर इतक्या अत्यंत सूक्ष्म जागेतून (Space) जात कर्करोगाचा संपूर्ण भाग यशस्वीपणे काढून टाकला.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; गोहत्या पुर्णपणे बंदीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती
”ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, कारण जराशीही चूक रुग्णाची नैसर्गिक मलविसर्जनाची क्षमता कायमची हिरावून घेऊ शकत होती. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि सूक्ष्म नियोजनामुळे आम्ही कर्करोग पूर्णपणे काढून रुग्णाचे अवयव सुरक्षित ठेवू शकलो.” अशी प्रतिक्रिया आपुलकी मेडिकल सेंटरचे डॉक्टर डॉ. राहुल पावशरे, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट यांनी दिली.
रुग्ण पूर्णपणे बरा…
शस्त्रक्रियेला आता जवळपास तीन महिने पूर्ण झाले असून रुग्ण नुकताच तपासणीसाठी (Follow-up) रुग्णालयात आला होता. रुग्णाची प्रकृती आता पूर्णपणे उत्तम असून, त्याला मलविसर्जनावर (Motion Control) चांगला ताबा मिळाला आहे. इतर सामान्य व्यक्तींप्रमाणेच तो नैसर्गिकरीत्या दैनंदिन विधी करू शकत आहे. आपुलकी मेडिकल सेंटरमध्ये झालेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कर्करोग रुग्णांसाठी एक आपुलकी मेडिकल सेंटरच्या माध्यमातून आवाक्यातील खर्चात कर्करोगावरील उपचारासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
