Download App

विधानसभेच्या तोंडावर जु्न्या वादाला रोहित पवारांकडून नवी फोडणी; मोदींचंही घेतलं नाव

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 23 उमेदवारांसाठी 18 सभा घेतल्या होत्या. मात्र, त्यापैकी फक्त पाच उमेदवार विजयी झाले होते.

  • Written By: Last Updated:

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांना भटकती आत्मा असे संबोधले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर आता शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या तोंडावर भटकती आत्म्याचा मुद्दा पुन्हा उकरून काढत मोदींचा टोला लगावला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी भटकत्या_आत्म्याची भीती अजूनही उतरली नसावी असा उल्लेक केला आहे.

रोहित पवारांची पोस्ट नेमकी काय?

एक-दोन महिन्यात निवडणुका असणाऱ्या राज्यात दोन-तीन दिवसाआड कार्यक्रम घेणारे पंतप्रधान मोदी साहेब निवडणुका जवळ आल्या असतानाही महाराष्ट्रात कार्यक्रमास येणे टाळत आहेत. विकासाच्या बाबतीत तसेच बजेटमध्ये केंद्राकडून दुर्लक्षित झालेला महाराष्ट्र आता राजकीय बाबतीतही दुर्लक्षित होत असल्याची चर्चा आहे.

राज्यसरकार विरोधात असलेल्या रोषातून महाराष्ट्रात वाहणाऱ्या परिवर्तनाच्या वाऱ्याचा अंदाज केंद्रीय नेतृत्वाला आला असावा किंवा भटकत्या_आत्म्याची भीती अजूनही उतरली नसावी, म्हणूनच महाराष्ट्राकडं दुर्लक्ष केलं जात असेल. पण परिवर्तनानंतर लवकरच महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृतपणाचं आणि आर्थिक सत्तेचं गतवैभव प्राप्त होईल, याची खात्री असल्याचे रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मोदींच्या 18 सभा विजय मात्र 5 जागांवर

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 23 उमेदवारांसाठी 18 सभा घेतल्या होत्या. मात्र, त्यापैकी फक्त पाच उमेदवार विजयी झाले होते. तर मुंबईत मोदींचा रोड शो झालेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघातही भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.

follow us