आळंदी : “मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. खूपवेळा सरपंच म्हणून गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन संघर्ष केला. पण सरकारला दया आली नाही”; अशा आशयाची चिठ्ठी लिहित एका सरपंचाने आत्महत्या केली आहे. व्यंकट नरसिंग ढोपरे (वय 60, मूळ रा. उमरदरा, ता. शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर) असे मृत सरपंचाचे नाव आहे. आळंदीमधील इंद्रायणी नदीत उडी घेत त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला. (sarpanch committed suicide in Alandi for Maratha reservation)
याबाबत अधिक माहिती अशी की, व्यंकट ढोपरे काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा संदीप यांच्या नऱ्हे-आंबेगाव येथील घरी राहायला आले होते. ढोपरे यांची मुलगी आणि जावई हे भोसरी परिसरात राहतात. शुक्रवारी (28 ऑक्टोबर) सकाळी साडे अकराच्या सुमारास ढोपरे हे आळंदी येथे देवदर्शनाला जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले. एका तासानंतर त्यांच्या सुनेने घरातील कपडे धुण्यासाठी घेतले तेव्हा ढोपरे यांच्या शर्टच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली.
“मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी नाकारली गेली. त्यामुळे तो बेकार फिरत आहे. गावातील 60 वर्षांवरील वृद्धांना शासकीय पेन्शन योजना मिळावी म्हणून मी अनेकांचे अर्ज शासन दरबारी दाखल केले. पण तहसिलदारांनी ही योजना दिली नाही. अधिकारी आणि राज्यकर्ते केवळ स्वतःची खळगी भरण्यात व्यस्त आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. खूपवेळा सरपंच या नात्याने गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन संघर्ष केला. पण सरकारला दया आली नाही. आरक्षण मिळत नसल्याने मी नैराश्यातून माझ्या प्राणाची आहुती देत आहे,” असे लिहिलेला मजकूर होता.
ही बाब घरात समजताच मुलाने व्यंकट ढोपरे यांना फोन केला, तेव्हा मी नैरश्यात आहे. पण काही करणार नाही असे सांगितले. पण संदीप यांनी भोसरी येथे बहिणीच्या घरी धाव घेतली. तेथून ढोपरे यांचे जावई किरण नितुरे आणि संदीप यांनी ढोपरे यांना व्हिडिओ कॉल लावला. तुम्ही असे काही करू नका. आम्ही आळंदीमध्ये येतो सांगितले. त्यानंतर दुपारी साडे तीन पर्यंत ढोपरे यांचा मोबाईल सुरू होता. त्यानंतर बंद झाला. संदीप आणि किरण या दोघांनी आळंदी मध्ये जाऊन शोध घेतला. पण ते कुठेच सापडले नाहीत.
मुलगा आणि जावई यांनी इंद्रायणी नदी पात्रालगत ढोपरे यांचा शोध घेतला. त्यावेळी साखरे महाराज यांच्या मठाजवळ सिद्धबेट बंधाऱ्यावर व्यंकट ढोपरे यांचे बुट, मोबाईल, पिशवीमध्ये काही कागदे सापडले. यानंतर जावई किरण नितूरे यांनी पोलिसांना फोन करत या घटनेची माहिती दिली. आळंदी पोलिसांनी शुक्रवारी रात्री आणि शनिवारी अग्निशमन दलाच्या मदतीने ढोपरे यांचा शोध घेतला. त्यावेळी शनिवारी त्यांचा मृतदेह मिळून आला. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.