पुण्यात ‘SIR’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाची 4.43 लाखांची फसवणूक; नक्की काय घडलं?

भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकाने एपीके फाइलमध्ये मागितलेली बँक खात्याची माहिती भरली.

Cyber Crime

पुण्यात 'SIR'च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाची 4.43 लाखांची फसवणूक; नक्की काय घडलं?

पुण्यात मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाच्या (SIR) नावाने सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदार यादी दुरुस्ती अर्जात चूक झाल्याचे सांगत सायबर भामट्यांनी कर्वेनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 4 लाख 43 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून सायबर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.

सायबर चोरट्यांनी 30 जुलै रोजी संबंधित ज्येष्ठ नागरिकाशी मोबाइलवरून संपर्क साधला. मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू असून, त्यांनी भरलेल्या अर्जात काही त्रुटी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर समाजमाध्यमावर तयार केलेला बनावट अर्ज पाठवून तो भरण्यासाठी पाच रुपये शुल्क द्यावे लागेल, असे भामट्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर एपीके फाइल पाठवली आणि त्यामध्ये बँक खाते क्रमांकासह अन्य माहिती भरण्यास सांगितले.

आपले, संदिग्ध, विरोधी; मतदारांची वर्गवारी? SIR मोहिमेवर रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा

भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकाने एपीके फाइलमध्ये मागितलेली बँक खात्याची माहिती भरली. ही माहिती मिळताच सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा ताबा मिळवला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 43 हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. ही रक्कम अन्य एका बँक खात्यात वळवण्यात आली. खात्यातून पैसे काढले गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

दरम्यान, SIRच्या नावाने नागरिकांना फोन, संदेश किंवा अन्य माध्यमातून संपर्क करून माहिती मागितली जात असल्यास सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषतः अनोळखी व्यक्तीने पाठवलेली एपीके फाइल मोबाइलमध्ये स्थापित करू नये तसेच कोणालाही ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा अन्य गोपनीय तपशील देऊ नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात पैसे ज्या बँक खात्यात वळवण्यात आले, त्याची माहिती मिळवून पुढील तपास केला जात आहे.

Exit mobile version