Download App

…तर शरद मोहोळ वाचला असता…; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर

  • Written By: Last Updated:

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीवर मोहोळ खूनप्रकरणातील मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने गोळीबार केला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर एका डॉक्टरने उपचार केले. उपचार झाल्यानंतर त्याला याविषयी कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने संबंधित तरूणाने कुठेच वाच्यता केली नाही. त्यामुळे पोळेकरने केलेल्या गोळीबाराचा प्रकार वेळीच उघडकीस आला असता तर, मोहोळचा जीव वाचला असता. अजय सुतार असे गोळीबार करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. (Sharad Mohol Murder Case Update)

Sharad Mohol : गँगस्टर शरद मोहोळचा धसका संजय दत्तनेही घेतला होता….

सहभागास नकार अन् थेट गोळीबार

अजय सुतार याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोळेकर आणि नामदेव कानगुडे या दोघांनी मोहोळच्या खुनात सहभागी होण्यासाठी अजयला भूगाव परिसरात बोलावून घेतले होते. यावेळी अजय याने यास नकार दिला. त्यावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. त्यानंतर अजय याने भूगाव येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी साहिल पोळेकरने अजयवर 2 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी फिर्यादीच्या पायाला लागली. त्यानंतर एका डॉक्टरने अजयवर उपचार केले. उपचार झाल्यानंतर त्याला याविषयी कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने संबंधित तरूणाने कुठेच वाच्यता केली नसल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु, गोळीबार केल्याची बाब त्याचवेळी समोर आले असते तर, शरद मोहोळच्या खुनाचा कटही उघड होऊन त्याचा जीव वाचला असता.

खळबळजनक! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या बॅनरवर ‘देशभक्त’ असा उल्लेख

मोहोळच्या हत्येची माहिती वकिलांना आधीच होती

मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही वकिलांना खुनाची आधीच माहिती होती, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शरद मोहोळ याच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. मात्र आरोपींना यश आले नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती. अॅड. उढाण याचे या हत्याकांडातील आरोपीशी खून करण्यापूर्वी बोलणं झालं होतं असं पोलिसांच्या तपासतात समोर आलं.

शरद मोहोळ यांच्या हत्येसाठी आरोपी धनंजय व्हटकर आणि सतीश शेडगे यांनी शस्त्रे मागवली होती. ही शस्त्रे त्यांनी मध्य प्रदेशातून आणली होती. त्यांना शस्त्रे देणाऱ्यांचा पुणे पोलिस शोध घेत आहेत. आरोपींनी एकूण चार शस्त्रे मागवली असून त्यापैकी तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय त्यांना आणखी काही शस्त्रे पुरवली होती का? याचाही पोलीस शोध घेत असल्याचे सुनील तांबे यांनी सांगितले.

follow us