Download App

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. दौंड तालुक्यातील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या (Anantrao Pawar English Medium School) नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काका-पुतण्या दुसऱ्यांदा एकत्र एका मंचावर येणार आहेत.

हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक जाहीर, 10 दिवसांत गुंडाळले जाणार अधिवेशन; विरोधक आक्रमक 

अजित पवार यांनी 2 जुलैला राष्ट्रवादीत कॉंग्रेसमध्ये बंडाळी करून शिंदे-फडणवीसांशी हातमिळवणी केली. अजित पवारांनासोबत राष्ट्रवादीचा एक मोठा गट गेल्यानं राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं. सत्तेत सहभागी होताच अजित पवारांनी पक्षावरच दावा ठोकला आहे. सत्तेत सहभागी होतांना त्यांनी शरद पवारांना निवृत्त व्हा, असं ठणकावलं होतं. अजित पवार गटाच्या मंत्री छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनीही पवारांच्या धोरणांवर टीका केली.

आता विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. चिंचोली येथे आज दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित पवार आहेत. नुकताच विद्या प्रतिष्ठानचा 56 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आले. मात्र, तेव्हा अजित पवारांनी शरद पवारांना मोठ्या शिताफीनं टाळलं होतं. अजित पवार हे शरद पवारांच्या मागूऩ निघून गेल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर साखर संकुलाच्या बैठकीत दोघेही आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यावेळी अजित पवार यांनी या बैठकीला दांडी मारली होती. मात्र, अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या कार्यक्रमात काका-पुतणे एकत्र येणार आहेत.

अलीकडेच शरद पवारांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला होता. अजित पवारांचं मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच राहणार आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली होती. त्यामुळे आता हे दोघेही एकाच मंचावर आल्यानंतर काय बोलणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us