पुणे : पुणे जिल्हा हा खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आणि पर्यायाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा बालेकिल्ला संभाळला. त्यामुळे मागच्या 30 ते 35 वर्षांपासून अजित पवार आणि पुणे जिल्हा हे एक वेगळेच समीकरणच बनले आहे. एक प्रकारे त्यांचे वर्चस्व तयार झाले आहे. अजितदादांचा वेगळा गट आणि चाहता वर्ग या जिल्ह्यात निर्माण झाला आहे. अनेक वर्ष त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले. (Sharad Pawar has given responsibility to Jagannath Shewale, Ashok Pawar, Devdutt Nikam for Pune district)
मात्र अजित पवार आणि पक्षातील विश्वासू सहकाऱ्यांच्या बंडखोरीनंतर पुण्याचा बालेकिल्ला पवारांच्या हातातून काहीसा निसटला आणि अजितदादांच्याच हातात गेला. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 10 आमदारांपैकी शिरुरचे आमदार अशोक पवार वगळता सर्वच जण अजितदादांच्या गोटात गेले. आता हातातून निसटलेला हाच बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी, अजितदादांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी आणि त्यांची मोर्चेबांधणी करण्यासाठी शरद पवार यांनी तयारी सुरु केली आहे. यासाठी पवार यांनी आपल्या जुन्या शिलेदारांची निवड केली आहे.
शरद पवार यांनी पुणे जिल्ह्याचे प्रमुखपदी म्हणजेच जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेचे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांची पक्षाच्या पुणे (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. शेवाळे यांनी यापूर्वीही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठ नेते म्हणून शेवाळे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यारुपाने जुन्या आणि अनुभवी शिलेदाराला ताकद देण्याचे काम पवारांनी केले असल्याचे दिसून येते.
शरद पवार यांनी अजित पवार यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अशोक पवार यांची पुण्याचे राष्ट्रवादीचे नवे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यातून एक प्रकारे शरद पवार यांनी पुण्यात अजितदादांना पर्याय शोधले असल्याचे बोलले जात आहे. अजितदादा आणि अशोक पवार या दोघांचे संबंध एकदम जवळचे आहेत. त्यांचे खंदे समर्थक म्हणून अशोक पवार ओळखले जातात. त्यामुळे ते अजितदादांसोबत राहतील अशी अटकळ पहिल्यापासून होती. पण अशोक पवारांनी दाखविलेल्या याच प्रामाणिकपणा आणि निष्ठेमुळे आता शरद पवार यांनी आपला बालेकिल्ला अशोक पवार यांच्या हाती सोपविला असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे देवदत्त निकम यांची पुणे जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रुपाने पवार यांनी वळसे पाटलांच्याच शिलेदाराला ताकद दिली आहे. त्यांच्यामुळे आंबेगाव विधानसभा आणि शिरुर लोकसभा निवडणूक वळसे पाटील आणि अजित पवार गटाला निवडणूक अवघड होणार असल्याचे सांगितले जात आहे.