Rohit Pawar : भाजपसोबत जाण्याचा निर्णय का बदलला? रोहित पवारांचा शिंदेंना खोचक टोला

Rohit Pawar : भाजपसोबत जाण्याचा निर्णय का बदलला? रोहित पवारांचा शिंदेंना खोचक टोला

Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापूर्वी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी पक्षाला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं होतं, असा गौप्यस्फोट भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता. तसेच आमदार सुनील शेळके यांनीही रोहित पवार (Rohit Pawar) अजितदादांच्य आधी भाजपसोबत जाण्यास आग्रही होते असा दावा केला होता. या दोघाही नेत्यांना आज आ. रोहित पवार यांनी उपहासात्मक शब्दांत प्रत्युत्तर दिले. आ. पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राम शिंदेंना टोला लगावला.

मी भाजपमध्ये (BJP) जाण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बारा वेळा बैठक घेतली. अमित शहा यांच्यासोबत तीस वेळा बैठका घेतल्या. इतकेच नाही तर मी बराक ओबामा यांच्यासोबतही बैठका घेत होतो. शेवटी मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत तीनदा बैठक घेतली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की भाजप हा हेकेखोर आणि दडपशाही करणाऱ्यांचा पक्ष असल्याने मी माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलला असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला.

काय म्हणाले होते राम शिंदे ?

रोहित पवार यांच्यावर टीका करताना राम शिंदे म्हणाले, रोहित पवारांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या निवडणुकीचे तिकीट पक्षाला ब्लॅकमेल करूनच मिळवलं होत. 2017 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीवेळी तिकीट देता की मी भाजपमध्ये जाऊ अशी थेट धमकीच त्यांनी राष्ट्रवादीला दिली होती. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्येही रोहित पवार यांनी हडपसर मतदारसंघातून भाजपकडे तिकीट मागितलं होतं, असाही आरोप आमदार शिंदे यांनी केला.

रोहित पवार हे भाजपकडून तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी ते भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही भेटले होते. त्यांच्याकडे रोहित पवार यांनी हडपसर किंवा शिवाजीनगरमधून विधानसभेच्या तिकीटाची मागणी केली होती, असाही दावा आमदार शिंदे यांनी केला होता. या दाव्यांना रोहित पवारांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं. आता राम शिंदे आणि सुनील शेळके काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज