अमेरिका-इस्रायल अन् इराण युद्धाची अनेक देशांना झळ, 30 ठिकाणी हल्ले, 200 इराणी नागरिकांचा मृत्यू

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 200 इराणी नागरिकांच्या मृत्यू झाला असून 800 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Iran...

जग युद्धाच्या विळख्यात सापडल्याची सध्याची स्थिती आहे. (War) मध्य पूर्वेतील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणनेही प्रत्युत्तर दिलं आहे. या हल्ल्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायलदेखील इराणवर जोरदार हल्ले करत आहे. इस्रायलच्या संरक्षण दलांनी इराणच्या 30 ठिकाणांवर हल्ला केला. त्यात अनेक सैन्य ठिकाणांचा समावेश आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 200 इराणी नागरिकांच्या मृत्यू झाला असून 800 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला फटका बसला आहे. जगभरातील हजारो विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. हवाई हद्द अचानक बंद झाल्यामुळे शेकडो उड्डाणांवर परिणाम झाला. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, अनेक विमाने वेगवेगळ्या हवाई हद्दीत घिरट्या घालताना दिसली आणि अनेकांना वळवावे लागले.

अमेरिका अन् इराणमधील युद्धसंघर्ष टोकाला; इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई मारले गेल्याचा दावा

दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान मध्यमार्गाने मुंबईला परतावे लागले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) भारतीय विमान कंपन्यांना 11 देशांच्या हवाई हद्दीतून उड्डाण टाळण्याचा सल्ला दिला आहे, तर एअर इंडिया, इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्पाइसजेट यांनी मध्यपूर्वेतील त्यांच्या उड्डाणे रद्द किंवा स्थगित केली आहेत. डीजीसीएने ज्या 11 देशांच्या हवाई हद्दीतून विमान कंपन्यांना उड्डाण टाळण्याचा सल्ला दिला आहे त्यात इराण, इस्रायल, लेबनॉन, युएई, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, इराक, जॉर्डन, कुवेत आणि कतार यांचा समावेश आहे.

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नवीन आदेश जारी न केल्यास हा सल्ला 2 मार्च 2026 पर्यंत लागू राहील. डीजीसीएने म्हटले आहे की हा निर्णय आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार आणि युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीच्या (EASA) संघर्ष क्षेत्र बुलेटिननुसार घेण्यात आला आहे. इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक भडकल्यास, पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन, त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते.

जर हा संघर्ष अधिक चिघळला, तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. किमतीत मोठी वाढ झाली तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते. तसेच, येणाऱ्या काही आठवड्यांत बाजारात मोठी अस्थिरता आणि चढ-उतार पाहायला मिळतील, असाही अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सोने आणि चांदी महाग होतील. युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण होते. गुंतवणूकदार पैसे शेअर बाजारातून काढून सोने आणि चांदीमध्ये गुंतवतात. यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती ऐतिहासिक पातळीवर जाऊ शकतात.

follow us