ममतादीदींना सर्वात मोठा दणका देणारे ऋतब्रता बॅनर्जी ठरले बंगालचे ‘शिंदे’; वाचा ऋतब्रता नेमके कोण?
TMC बंगाल विधानसभेचे अध्यक्ष रतेंद्र बोस यांनी पक्षाचे बंडखोर नेते ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे.
Who Is Ritabrata Banerjee : सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहण्यास मिळत आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये फूट पडली असून, विधानसभा अध्यक्षांनी पक्षातून काढून टाकलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांच्यासह 58 बंडखोर नेत्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. तसेच अध्यक्षांनी ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांच्या नाकावर टिच्चून आमदार फोडणारे ऋतब्रता बॅनर्जी नेमके कोण आहेत, याबद्दल आता देशभरात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया..
डाव्या चळवळीतून सुरुवात
ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात डाव्या विचारसरणीच्या ‘SFI’ (Student Federation of India) या विद्यार्थी संघटनेतून केली. डाव्या पक्षांमध्ये त्यांनी आक्रमक नेता म्हणून ओळख निर्माण केली होती. 2014 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०२४ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा राज्यसभेवर पोहोचले. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी डाव्या पक्षांना सोडचिठ्ठी देत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे त्यांना टीएमसी ट्रेड युनियनचे (INTTUC) प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले.
2026 च्या निवडणुकीत विजय आणि बंड
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऋतब्रता बॅनर्जी हे ‘उलुबेरिया पूरबा’ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. पण TMC ची सत्ता जाताच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत बंडाचे निशाण फडकावले. ममता बॅनर्जी यांच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून आणि पक्षात अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावाला विरोध म्हणून ऋतब्रता यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
सिग्नेचर स्कँडल
TMC मधील हा वाद तथाकथित ‘सिग्नेचर स्कँडल’ (Signgate) मुळे निर्माण झाला आहे. टीएमसीमधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रता आणि संदीपन साहा यांनी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या काही कागदपत्रांवर त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या पश्चिम बंगाल सीआयडीकडून सुरू आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता नियुक्तीशी संबंधित कागदपत्रांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ऋतब्रता बॅनर्जी ठरले बंगालचे ‘शिंदे
महाराष्ट्राच्या राजकारणातही काही वर्षांपूर्वी अशीच घडामोड घडली होती. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडत सर्वाधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्याने शिवसेना पक्ष त्यांचा झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तसेच झाले होते. ज्याच्याकडे सर्वाधिक आमदार त्यांचा पक्ष असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तशीच काहीशी परिस्थिती आता तृणमूल काँग्रेसची झाली आहे.