Indapur Assembly Election : इंदापूरची विधानसभेची जागा अजित पवार हर्षवर्धन पाटील यांना सोडणार, या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याचं कारण लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती इंदापूर तालुक्याची. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजकीय शत्रुत्व विसरत हर्षवर्धन पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. खुद्द देवेंद्र फडणवीसांना यासाठी मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली. परंतु, देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने दोघांमध्ये नेमकं काय ठरलं, हे जाहीर झालं नाही. (Indapur) लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. खुद्द हर्षवर्धन पाटील यांचं गाव असणाऱ्या बावड्यातून सुप्रिया सुळे यांना लीड मिळालं त्यामुळे आता विधानसभेचे गणित कसं साधणार ही चर्चा सुरू झाली आहे.
वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस पक्ष १०० पेक्षा जास्त घर बांधणार; राहुल गांधींची मोठी घोषणा
इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार ही जाग सोडतील, याची शक्यता जवळपास नाही. हेच ओळखून हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी आपली जुनीच हाक दिली आहे. कारण अनेकवेळा हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढलेले आहेत. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी ‘काहीही झालं तरी यावेळी हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढवणारच, ती कशी लढायची, यावर आताच काही बोलणार नाही. मात्र, निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत,असं सांगत हर्षवर्धन पाटील निवडणुकीच्या रिंगणात असतील याचे संकेत दिले आहेत.
विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या खास मर्जीतील. महाविकास आघाडीचे सरकार आले त्यावेळी भरणे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. सोबत सोलापूरचे पालकमंत्रिपद देखील मिळाले. भरणे यांनी लोकसभेला सुनेत्रा पवारांना लीड देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, लोकसभेचे वारे महाविकास आघाडीच्या बाजुने होते. महायुतीमध्ये विद्यमान आमदार असलेल्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, असं सूत्र ठरलं आहे. त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवार यांच्याकडे राहणार आणि दत्तात्रय भरणे यांना अजित पवार यांच्याकडून पुन्हा संधी मिळणार हे निश्चित मानलं जात आहे.
बापरे! एका वर्षात 2 लाखांपेक्षा अधिक लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं, राज्यसभेत मांडली आकडेवारी
हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या पुन्हा लढत होण्याची शक्यता असताना शरद पवार गटाने देखील मोठी खेळी केली आहे. अजित पवार गटात असलेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांना शरद पवार गटात प्रवेश दिला आहे. ते लवकरच पक्षप्रवेश करतील. विधानसभेसाठी प्रवीण माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. त्यामुळे इंदापूरमध्ये तिरंगी लढत अटळ मानली जात आहे.दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय इतिहास मोठा रंजक आहे. अपक्ष म्हणून आमदारकीची हॅटट्रीक हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. 1995, 1999 आणि 2004 असे सलग तीन वेळा हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत.
2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसच्या तिकीटावर पाटील पुन्हा आमदार झाले. 2014 मध्ये आघाडी तुटली त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा 14 हजार मतांनी पराभव केला.2019 मध्ये पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत घरोबा केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत पाटील यांना भरणे यांच्याकडून तीन हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. अपक्ष म्हणून सलग तीन वेळा विजय मिळवणारे पाटील हे अपक्ष म्हणून लढले तर पुन्हा यश मिळवतील, याचा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. म्हणूनच पोस्टरबाजी करत पुन्हा अपक्ष लढण्याची साद ते पाटील यांना घालत आहेत.
इंदापूरचे राजकारण प्रामुख्याने दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भोवती फिरते. मात्र, या राजकारणात प्रवीण मानेंच्या शरद पवार गटातील एन्ट्रीने तालुक्यातील राजकीय समीकरणंच बदलली आहेत. मानेंची ताकद माहिती असल्यानेच लोकसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांची घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या प्रचारात दिसणारे माने यांनी ते अजित पवार गटासोबत असल्याचं जाहीर केले. मात्र, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण माने अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात सामील होत आहेत. ‘सोनाई’ परिवाराच्या माध्यमातून माने यांची मोठी ताकद आहे. लोकसभेनंतर महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. शरद पवार यांच्याविषयी तालुक्यात सहानुभूती आहे. त्यामध्ये विधानसभेला भरणे आणि पाटील यांच्यापेक्षा वेगळा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात असेल तर इंदापूरची जनता नक्कीच वेगळा विचार करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.