Shubhada Kodare Murder : गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात (Pune) सुरु असणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून यातच शुभदा कोदारे हत्या प्रकरणामुळे (Shubhada Kodare Murder) पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येरवडा येथील आयटी (IT) कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे हत्येने खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे. आयटी कंपनी शुभदासोबत काम करणाऱ्या तिच्या सहकाऱ्याने पार्किंगमध्ये चॉपरने हल्ला करून तिला संपवलं.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वादातून शुभदा कोदारेची हत्या करण्यात आली . कृष्णा कनोजा (Krishna Kanoja) असे आरोपीचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शुभदा आणि कृष्णा हे दोघे एकमेकांना ओळखत होते मात्र काही दिवसांपासून दोघांमध्ये आर्थिक वाद सुरु होता. वडिलांना हाय शुगर आहे, त्यांच्या ऑपरेशनसाठी आणि ट्रिटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून शुभदाने कृष्णाकडून चार लाख रुपये घेतले होते. यानंतर देखील शुभदा कृष्णाकडे पैशाची मागणी करत होती. त्यामुळे कृष्णाला तिच्यावर संशय आला आणि त्याने थेट शुभदाच्या गावी जाणून तिच्या वडिलांची भेट घेतली मात्र तिथे आपली कसली शस्त्रक्रिया झाली नाही आणि आम्ही कधीही शुभदाकडे पैशांची मागणी केली नसल्याची माहिती वडिलांनी कृष्णाला दिली. त्यामुळे वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली आणि त्यानंतर शुभदाकडे दिलेले पैसे परत मागण्यास कृष्णाने सुरुवात केली.
मंगळवारी सायंकाळी कंपनीतून घरी जाताना कृष्णाने तिला गाठलं आणि पैशांची मागणी केली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात कृष्णाने भाजी कापण्यासाठी वापरलेल्या चॉपरने तिच्या हातावर जोरात 4-5 वार केले. या हल्ल्यात शुभदा जागीच कोसळली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिला लो शुगरचा आजार असल्याने तिचे रक्त गोठवले जात नसल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजाला अटक केली आहे. कृष्णाला न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.