Download App

..तर चंद्रकांत पाटलांना पुणे सोडावं लागेल…

  • Written By: Last Updated:

विष्णू सानप, लेट्सअप, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव भाजपच्या चांगला जिव्हारी लागल्याने त्याची अधिक चर्चा होत आहे. महाविकास आघाडीचे (काँग्रेस) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रासनेंचा 11 हजार 40 मतांनी पराभव करत भाजपच्या बालेकिल्याला सुरुंग लावला आहे. अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केलेल्या भाजपवर यामुळे मोठी नामुष्की ओढवली आहे.

दरम्यान, हा पराभव जरी रासने यांचा असला तरी याचा फटका एकूणच पुणे भाजप पदाधिकारी आणि राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यातही चंद्रकांत पाटलांना तो अधिक बसेल, अशी शक्यता अधिक आहे.

चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूरचे. मात्र, त्यांचं पुनर्वसन पुण्यातील कोथरूड या भाजपच्या सुरक्षित विधानसभा मतदारसंघात करण्यात आलं. त्यामुळे या मतदारसंघाचे नेतृत्व केलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी या देखील नाराज आहेत. मात्र भाजपमध्ये पक्ष शिस्त पाळावीच लागते या नियमानुसार त्या सध्या शांत आहेत. मात्र, त्या फार काळ शांत राहतील अशी शक्यता फार कमी आहे.
याचे कारण असे की, पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, आज घडीला एकाही मतदारसंघांमध्ये ब्राह्मण आमदार नाही. ही ब्राह्मण समाजाची नाराजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीतही भाजपने ब्राह्मण उमेदवाराला अर्थात टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारली आणि ब्राह्मण समाजाच्या नाराजीचा फटका रासनेंना बसला आणि त्यांना पराभव पत्करावा लागल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. ही निवडणूक भाजपकडून प्रतिष्ठेची करण्यात आल्याने त्यासाठी दिल्लीपासून फिल्डिंग लावण्यात आली होती. या निवडणूक प्रचारासाठी अप्रत्यक्षरीत्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपचे राज्यातील प्रमुख 40 स्टार प्रचारकांसह कार्यकर्त्यांच्या फौजांची कुमक कसब्यात पाठवण्यात आली होती. शिवाय चंद्रकांत पाटील हे पुण्यातच असल्याने त्यांच्यावर या निवडणुकीची विशेष जबाबदारी होती. मात्र, तरीही भाजपला या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने मोठी नामुष्की ओढवली आहे. त्यातच हा पराभव नेमका महापालिका निवडणुकी आधी लागल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Naatu Naatu wins Oscar | RRR चित्रपटाने रचला इतिहास 

यामुळे या पराभवाचे खापर भाजपचे वरिष्ठ नेते हे दबक्या आवाजात चंद्रकांत पाटील, पुणे भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांवर फोडत आहेत. तर भाजपचे नेते संजय काकडे यांनी तर उघडपणे आमचा उमेदवार चुकीचा होता, असे सांगत या पराभवाला माझ्यासह चंद्रकांतदादा पाटील आणि पुण्यातील स्थानिक पदाधिकारी जबाबदार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. मात्र, यामुळे पाटलांवर हळूहळू दबाव यायला सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात असूनही पुण्यातील बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव कसा होऊ शकतो? अशी राज्यातील भाजप नेत्यांमध्ये कुजबूज सुरू आहे.

दुसरीकडे, पुण्यात भाजपला कसब्यात किंवा कोथरूडमध्ये ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी द्यावी लागणार आहे. अन्यथा भाजपाला त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. या पोटनिवडणुकीत रासने यांना कसब्यातून उमेदवारी दिल्याने आधीच ब्राह्मण समाज चिडलेला आहे. भाजपकडून या गोष्टीचा खंडन जरी केलं जात असला तरी ही वस्तुस्थिती आहे.

US : सिलिकॉन व्हॅलीनंतर आता अमेरिकेत सिग्नेचर बँकेचे दिवाळे

दरम्यान, आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कसबा आणि कोथरूडमध्ये कोण उमेदवार दिला जाईल याची चर्चा आतापासूनच रंगत आहे. यामध्ये कसब्यातून टिळक कुटुंबीय किंवा बापटांच्या सुनबाईंना तिकीट मिळू शकते, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र, असं झालं नाही आणि पुन्हा रासने किंवा अन्य कुठल्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची झाल्यास कोथरूड मधील चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकत आणि त्यांना वेगळा मतदार संघ शोधवा लागू शकतो.

मुळात चंद्रकांत पाटलांना पवारांचा जिल्हा असलेल्या पुण्यावर वचक ठेवण्यासाठीच आणलं गेलं होतं. मात्र, आता पुण्यातील बालेकिल्ल्यातच पराभव होत असल्याने पाटलांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातही आधीसारखं देवेंद्र फडणवीस आणि पाटलांमध्ये जुळत नसल्याच्याही चर्चा ऐकायला मिळतात. त्यामुळे पाटलांना पुढील काळात पुण्यात राजकारण करणं अवघड होऊ शकतं.

Old Pension Scheme : जुन्या पेन्शनवर तोडगा नाहीच, कर्मचारी संपावर ठाम

दरम्यान, पाटलांच्या वक्तव्यांमुळे भाजपची अनेकदा कोंडी झाली आहे.तर कसबा पोटनिवडणूक प्रचारात धंगेकर हे साधे नगरसेवक आहेत त्यांना कोण ओळखतं, धंगेकर कोण आहेत?, असं वक्तव्य करून त्यांनी ते धंगेकरांच्याच पथ्यावर पाडलं होतं. नेमक पाटलांच्या याच टिकेला प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि पाटलांची चांगलीच कोंडी केली आहे. आता आगामी महापालिका निवडणूक, विधानसभा, लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेत पाटलांचं काय स्थान असेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Tags

follow us