Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांना (Santosh Deshmukh Murder Case) मोठं यश मिळालं. या प्रकरणात काही दिवसांपासून फरार असलेल्या सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे या दोघांना अटक करण्यात आली. तर आणखी एक आरोपी अजूनही फरार आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी जंग जंग पछाडणाऱ्या पोलीस यंत्रणा आणि सीआयडी पथकांचं हे मोठं यशच म्हणावं लागेल. पण, हे फरार आरोपी पोलिसांना हाती लागण्यामागेही मोठी स्टोरी आहे. तपास यंत्रणांची सतर्कता, हत्येच्या प्रकरणातील एक एक कडी जोडत सुरू असलेला तपास अन् एका डॉक्टरची चौकशी सुदर्शन घुलेपर्यंत घेऊन गेली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आज आपण याच घटनाक्रमाची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. हत्येचं प्रकरण गंभीर असल्याने आरोपींच्या शोधासाठी बीड पोलीस, एसआयटी आणि सीआयडीने विशेष पथके तयार केली होती. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेत वेगाने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम गठीत केल्या होत्या.
मुख्य आरोपी तर आकाच; सुदर्शन घुले केवळ प्यादं, भाजप आमदार सुरेश धस यांचा हल्लाबोल सुरुच
या टीमच्या मदतीने आरोपींचे मोबाइल लोकेशन आणि ते ज्या लोकांच्या संपर्कात होते त्या लोकांना गाठून त्यांच्याकडून माहिती गोळा केली जात होती. या चौकशीतून माहिती मिळत होती. पण, फरार आरोपींनी त्यांच्याकडील मोबाइल बंद केले होते. नवीन सीम कार्ड घेऊन त्याद्वारे संपर्क केला जात होता. पण तरीही यंत्रणांनी त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून माहिती मिळवली. याच माहितीच्या आधारे दोघा जणांना ताब्यात घेतले.
पण, यात आणखी एक महत्वाचा दुवा आहे. तो म्हणजे डॉ. संभाजी वायबसे. या प्रकरणात डॉ. वायबसे आणि त्याच्या वकील पत्नीला ताब्यात घेण्यात आलं. आरोपींना मदत संभाजी वायबसेनेच केल्याचं सांगितलं जात आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून संभाजी वायबसे फरार झाला होता. त्यामुळे तपास यंत्रणांचा संशय बळावला होता. पोलिसांकडून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात होतं. पण, तरीही तो काही हाती लागत नव्हता.
मध्यंतरी तो राज्याबाहेर गेल्याचीही माहिती मिळाली होती. परंतु, पोलिसांना असा संशय होता की एक व्यक्ती मर्डर झाल्यापासून गायब आहे. तिचा खूनाशी काही संबंध नाही पण ती नॉट रिचेबल कशी काय होऊ शकते. त्यामार्फत या सगळ्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न झाला. स्थानिकांनाही विचारणा झाली. त्यानंतर वायबसेबाबत प्राथमिक माहिती मिळाली. पुढे अधिक तपासाअंती डॉ. वायबसे आणि त्याच्या पत्नीला नांदेडमधून ताब्यात घेण्यात आलं. डॉ. वायबसेच्या चौकशीतूनच पुण्याचं कनेक्शन समोर आलं. या चौकशीतूनच पोलिसांना फरार असलेल्या सुदर्शन चंद्रभान घुले, सुधीर ज्ञानोबा सांगळेचे धागेदोरे मिळाल्याचे आता समोर आले आहे.
लई अवघड हाय गड्या उमगाया “बाप्पा “रं… मिटकरींची पोस्ट चर्चेत, वाल्मिक कराड अन् बजरंग सोनवणे एकत्र?
वायबसेंनीच या आरोपींना लपायला मदत केली असं पोलिसांना सुरुवातीला वाटत होतं पण या गोष्टी अजून कुठेही कागदावर घेतलेल्या नाहीत. ही फक्त प्राथमिक माहिती आहे. पोलीस यंत्रणेकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर यामध्ये स्पष्टता येईल. पण फरार आरोपींना शोधण्यासाठी डॉ. वायबसेंनी काही इनपुट्स दिले आणि हे प्रकरण पुढं गेलं इतकं मात्र नक्कीच म्हणता येईल.
दरम्यान, या प्रकरणात बीड पोलिसांचं विशेष शोध पथक नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांनी डॉ. संभाजी वायबसे यांच्याकडे चौकशी करून गोपनीय माहितीच्या आधारे दोघा आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हे अन्वेषण विभागाकडे पुढील तपासासाठी देत आहोत असे बीड पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे.