पुणे : ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या नावाची राज्य सरकारकडून पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. यासोबतच शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.
बालगंधर्व रंगमंदिरात अशोक सराफ यांना कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक गो. बं. देगलूरकर, भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते.
छगन भुजबळांच्या कानाखाली मारा अन् एक लाख जिंका! कोणी केली घोषणा?
यावेळी बोलतांना मुनगंटीवार म्हणाले की, अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने लोकांना आनंद दिला. त्यांना विनोदवीर, विनोदाचा बादशाह म्हटलं जातं. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं आणि त्यांच्या हृदयावर अनेक वर्षे राज्य करण्याचे खडतर काम त्यांनी केले आहे. आज समाजात प्रचंड मोठं कर्तृत्व आणि नम्रता एकाच ठिकाणी आढळत नाही. मात्र, अशोकजी त्याला अपवाद आहेत. प्रचंड मोठी उंची असलेल्या या कलावंतानं आपल्या अभिनयातून समाजातील नैतिकता, संस्कारही प्रकट केले, तर दुसरीकडे प्रशासनातील उणिवाही तितक्याच ठामपणे मांडल्या. अभिनयासोबत त्यांची शब्दफेकही ताकदीची आहे, असं ते म्हणाले.
महाराष्ट्र शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने ब्रिटीश संग्रहालयाने वाघ नखे परत देण्याची विनंती मान्य केली, असंही मुनगंटीवार यांनी सांगिलतं.