Download App

संभाजीराजे छत्रपतींचे सक्रिय राजकारणात आणखी एक पाऊल; फटका कोणत्या पक्षाला बसणार?

पुणे : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या ‘स्वराज्य’ (Swarajya) या राजकीय संघटनेचे सक्रिय राजकारणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. पुण्यातील (Pune) शिवाजीनगरला ‘स्वराज्य’ संघटनेच्या ‘स्वराज्य भवन’चा या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज (शनिवारी) पार पडला. स्वराज्य भवनचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत एक भव्य शोभा यात्राही काढण्यात आली. (Sambhajiraje Chhatrapati’s Swarajya political party central office ignoration in Pune)

दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वराज्य संघटनेचे पहिले राज्यव्यापी एक दिवसीय अधिवेशनही संपन्न होणार आहे. संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती इथे शेकडो कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. स्वराज्य संघटनेची पुढील राजकीय भूमिका आणि ध्येयधोरण काय असणार याबाबत कार्यकर्त्यांना या अधिवेशनात सांगणार असल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती आता स्वराज्यची नेमकी काय राजकीय भूमिका जाहीर करतात आणि याचा फटका कोणत्या राजकीय पक्षाला बसणार हे आगामी काळात दिसून येणार आहे.

स्वराज्य संघटनेची स्थापना :

संभाजीराजे छत्रपती यांनी काही महिन्यांपूर्वी राजकारणामध्ये नवा पर्याय म्हणून स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करुन आपले पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या विविध भागांमध्ये जाऊन त्यांनी लोकांचे प्रश्न, लोकांची मत जाणून घेतली.

किती दिवस आम्ही मोर्चे काढायचे, आंदोलन करायची, सामान्य नागरिकांना ताकद द्यायला हवी. ‘स्वराज्य’ या नावाचा अर्थ आहे की, हे एका जातीचे नाही, १८ पगड जाती बारा-बलुतेदार संघ यांना सोबत घेणार आहे. त्यामुळे आम्ही या लोकांना आमदार-खासदार करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे संभाजीराजे छत्रपती स्वराज्य संघटनेच्या स्थापनेवेळी म्हणाले होते.

येणाऱ्या २०२४ मधील निवडणुका या मुख्यत: आमचे टार्गेट आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरु आहे. २०२४ ला आमचे उमेदवार तुम्हाला नक्की दिसतील आणि विजयी होतील. स्वतःची ताकात उभी करणार आहोत. येत्या काळात कोणासोबत जायचे असेल तर तो पर्याय देखील खुला असणार आहे, असेही संभाजीराजेंनी सांगितले होते.

Tags

follow us