Download App

पराभव रासनेंचा मात्र चंद्रकांतदादांसह पुणे भाजप पदाधिकाऱ्यांचं वाढलं टेन्शन…

विष्णू सानप
पुणे : पुण्यातील (Pune) कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका (By Election)संपूर्ण राज्यासाठी (Maharashtra)लक्षवेधी ठरल्या. या निवडणुकीत भाजपचे (BJP)उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne)यांचा महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)(काँग्रेस) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांनी 11 हजार 40 मतांनी पराभव करत भाजपच्या बालेकिल्याला सुरुंग लावला. यामुळं भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे.

दरम्यान, हा पराभव जरी रासने यांचा असला तरी याचा फटका एकूणच पुणे भाजप पदाधिकारी आणि राज्य पातळीवरील नेत्यांना बसण्याची शक्यता आहे. यामुळं पुणे भाजपचं टेन्शन चांगलच वाढलं आहे.

भारतात फक्त छत्रपती संभाजीराजांचाच उदो उदो होईल; फडणवीसांनी ठणकावले!

केंद्रात, राज्यात सत्तेत असलेल्या आणि महापालिकेतही सत्तेत राहिलेल्या भाजपला आर्थिकदृष्ट्या ताकदवान उमेदवार देऊनही काँग्रेसच्या पडत्या काळात देखील त्यांच्या उमेदवारांकडून पराभव पत्करावा लागल्यानं हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर कसब्यात उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत भाजपकडून मोठं मंथन करण्यात आले, काही सर्वेही करण्यात आले होते.

त्यानंतर भाजकडून टिळक कुटुंबीयांना डावलून रासने यांची उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे कसब्यातील ब्राह्मण समाज कमालीचा नाराज झाला होता. हे नाराजी नाट्य अनेक दिवस चालले. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कशीबशी टिळक कुटुंबीयांची समजूत काढली. मात्र, मतदारांमध्ये धुसफूस सुरूच होती.

दरम्यान, ब्राह्मण समाजावर अन्याय झाला, या मुद्द्यावरून हिंदू महासंघ आणि ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि भाजपच्या विरोधात उघड बंड पुकारले. याचा प्रत्यक्ष निकालानंतर भाजपला काहीही जास्त फटका बसला नाही. मात्र, दवेंनी ब्राह्मण समाजातील काही मतदारांना निश्चितच संभ्रमावस्थेत टाकलं होतं. याचाही फटका भाजपला बसल्याचं बोललं जाते.

शेवटी जे व्हायचं नव्हतं, तेच झालं. धंगेकर यांचं कसब्यातील पूर्व भागावर प्राबल्य असणाऱ्या भागात त्यांना मोठा लीड मिळेल असा अनेकांचा कयास होता. मात्र, झालं उलटच. धंगेकरांना कसब्यातील पश्चिम भाग म्हणजेच पेठांतील मतदारांनीच चांगली साथ दिली आणि रासनेंचा तिथेच पराभव निश्चित झाला. गत निवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना या भागातून 21 हजाराचं मताधिक्य होतं रासनेंना मात्र फक्त सात हजार इतकच ते मिळालं. नेमका याचाच फटका रासनेंना बसला आणि त्यांचा पराभव झाला.

पेठ परिसरातील भाजपच्या घटलेल्या मताचा फटका नेमका कुणामुळं बसला? याबाबत पुणे भाजप आणि एकूणच राज्यातील वरिष्ठांकडून उलट तपासणी केली जात आहे. भाजपच्या एका कार्यक्रमात रासनेंनी तर उघडपणेच ज्यांनी कुणी धंगेकरांना साथ दिली त्यांना मी पाहून घेईल, असा सज्जड दमच देऊन टाकला, असंही बोललं जात आहे. तर भाजप नेते संजय काकडे यांनी हा पराभव पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, स्थानिक पदाधिकारी आणि रासनेंच्या माथी मारला. यामुळं पुणे भाजपमध्ये काहीही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट आहे.

दरम्यान, निवडणुकीपूर्वीच काकडे यांनी कासब्यातील नगरसेवकांना आपल्या प्रभागातून मताधिक्य मिळवून देण्याचं टार्गेट दिलं होतं. मात्र, झालं उलटच. मताधिक्य तर मिळवून देताच आलं नाही पण ते रासनेंच्याही प्रभागातही घटलं. यामुळं पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटलेल्या या मतामुळं कसब्यातील आणि अर्थातच पुणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं चांगलचं टेन्शन वाढलं आहे. आता रासनेंचा हा पराभव भाजपच्या किती स्थानिक अन राज्यस्तरीय नेत्यांच्या मुळावर उठतो आणि कुणाकुणाला याचा फटका बसतो? हे आगामी काळात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Tags

follow us