Download App

मोठी बातमी! वेल्हे तालुक्याचं नाव आता ‘राजगड’! मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय!

  • Written By: Last Updated:

मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्याच (Velhe Taluka) नाव बदलून राजगड (Rajgad) तालुका करण्यात यावं अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. स्थानिक प्रतिनिधींसह उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करावं, ही मागणी लावून धरली होती. अखेर स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला.

‘नाशिक’मध्ये ठाकरे गट, ‘दिंडोरी’त आमचा उमेदवार; शरद पवारांनी सोडवलं उमेदवारीचं गणित 

याबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेता आला. वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Government Schemes : कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चालविलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव प्राप्त करुन घेणे, पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करुन घेणे, पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती.

राज्याचे विरोधी पक्षनेते असताना 27 एप्रिल 2023 ला त्यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी वेळोवेळी केलेली मागणी आज त्यांच्याच उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहे. याचा वेल्हे तालुका, पुणे जिल्हा आणि समस्त महाराष्ट्रवासियांना अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा निर्णय घेण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे, जिल्हा परिषद सदस्यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

विरोधी पक्षनेता असतांना केली होती मागणी
विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असतांना अजित पवार यांनी वेल्हे तालुक्याचे नाव बदलून राजगड तालुका असं करावं, त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली होती. पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे शासन चालवलं, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. वेल्हे तालुक्यातील नागरिकांच्या भावना राजगड किल्ल्याशी जोडलेल्या आहेत. त्यामुळेच वेल्हे तालुक्याचे नाव बदलून राजगड व्हावं, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.

follow us