प्रतिनिधी : विष्णू सानप
Ravindra Dhangekar : काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यांनी काल (ता. 11 मार्च) काँग्रेसचा हात सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धंगेकरांच्या शिवसेना (Shivsena) पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगत होत्या मात्र धंगेकर त्यास अधिकृत दुजोरा देत नव्हते मात्र काल त्यांनी सस्पेन्स संपवत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र धंगेकरांच्या या प्रवेशामुळे पुण्यात आणि एकूणच त्यांच्या कसबा मतदारसंघात भाजप विरुद्ध धंगेकर आणि भाजपचे (BJP) कासब्याचे आमदार हेमंत रासने (Hemant Rasne) विरुद्ध धंगेकर अशा संघर्षाचा दुसरा अंक पाहायला मिळणार,अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
भाजपने पोटनिवडणुकीत पूर्ण शक्ती लावून देखील रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना चितपट केले होते. या विजयामुळे धंगेकर यांचे नाव महाराष्ट्रभर पोचलं. याचीच दखल काँग्रेस श्रेष्ठींनी घेत धंगेकरांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं मात्र यावेळी धंगेकर यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आणि विशेष म्हणजे ज्या कसब्यात त्यांनी विजय मिळवला त्याच कसब्यात भाजपचे उमेदवार खासदार, केंदीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लीड मिळवलं, हा धंगेकरांना मोठा धक्का होता. मात्र काँग्रेसने पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत धंगेकरांना संधी दिली मात्र याही वेळी धंगेकरांना रासनेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि रासनेंनी पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला.
धंगेकर आणि रासने हे दोघेही नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेत काम पाहत होते त्यानंतर यांचा सामना विधानसभा निवडणुकीत झाला आणि संघर्षाचा भडका उडाला. आमदारकीची निवडणुक, पोटनिवडणुक लढवण्याचा अनुभव नसलेले धंगेकर रासनेंवर भारी पडले. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणूक आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीत रासनेंनी हिशोब चुकता केला. आता पुन्हा रासने आणि धंगेकर राजकीय विरोधक म्हणून नाही तर मित्र पक्षाचे नेते म्हणून एकमेकांसमोर येणार आहेत. मात्र आत्तापर्यंतचा दोघांमधील संघर्ष पाहता दोघांमध्ये दिलजमाई न होता एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी कोणीही सोडणार नाही. हे मात्र नक्की. दोघांचाही मतदारसंघ एकच आणि महत्त्वकांक्षा देखील सारख्याच असल्याने ‘एक म्यान मे दो तलवार’ असंच काहीसं कसब्यात तरी झाला आहे.
लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत सलग पराभव पत्करावा लागल्याने धंगेकर बॅकफूटवर गेले. राज्यात मोठे बहुमत मिळाल्याने महायुती सरकार आले. यामुळे निवडणूक झाल्यापासून धंगेकर कमालीचे शांत पाहायला मिळाले. पोटनिवडणुकीत ज्या लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतलं त्यांनीच आपल्याला परत का स्वीकारलं नाही याचं परीक्षण शिवाय आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांनी दगाफटका तर केला नाही ना? या प्रश्नाचे उत्तर धंगेकरांनी नक्कीच शोधायचा प्रयत्न केला असणार, मात्र लोकांची काम करायची असेल आणि पुन्हा निवडणूक लढवायची असेल तर पाच वर्ष बाहेर राहून काढणं अवघड असल्याचे लक्षात आल्यानंतर धंगेकरांनी सत्तेत असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याच अनेक राजकीय जाणकार सांगतात.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील पुण्यामध्ये ताकद वाढवण्यासाठी आक्रमक चेहऱ्याची गरज होतीच ती धंगेकरांच्या रूपाने त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यामुळे सुरुवातीपासून काम पाहत असलेले शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि इतर मंडळी यांच्या मनात काय सुरू आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, धंगेकरांची आत्तापर्यंतची भाजप विरोधातली आक्रमक भूमिका आणि पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांच्यासमोर केलेल भाषण पाहता धंगेकर युतीधर्म पाळण्यापेक्षा भाजपला शिंगावर घेण्याची भूमिका घेतील,अशी शक्यता जास्त आहे.
विधान परिषद मिळणार?
शिवसेना पक्षप्रवेशाच्या आधी कुठल्या अटी शर्तीवर त्यांचा पक्षप्रवेश थांबला होता आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना काय शब्द दिलाय हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकामध्ये धंगेकरांच्या अपेक्षा काय? विधान परिषद की अजून काही धंगेकरांच्या पदरात पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
… म्हणून आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
दरम्यान, धंगेकर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये आल्याने भाजप नेत्यांना त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागणार आहे. मात्र धंगेकर किती जुळवून घेतात आणि यांच्यामध्ये किती सख्य राहणार याकडे संपूर्ण पुणेकरांच लक्ष लागल आहे.