Mahrashtra primary and higher schools summer vacations will be reduced: राज्यातील प्राथमिक, उच्चस्तरावरील सुमारे 30 टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीचे मराठीचे पुस्तक वाचता येत नाही. तर 65 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही. तर तिसरी व पाचवीच्या स्तरावरील सुमारे 50 टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नाही, असा अहवाल ‘असर’कडून नुकताच प्रसिद्ध झालाय. त्यावर प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर प्राथमिक शिक्षकांनी असरचा अहवाल फेटाळला असला तरी शासनस्तरावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा यंदा उशीरा होणार आहे. त्यामुळे यंदा शाळांच्या सुट्ट्यांवर कसा परिणाम होणार आहे हे सोपा विषयातून जाणून घेऊया…
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तर प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असते. त्यामुळे सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा निर्णय शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी घेतलाय. त्यानुसार एप्रिल महिन्यात राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर याच या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-1 व संकलित मूल्यमापन चाचणी-2 अशा तीन चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांना तिसरी ते नववीसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी संकलित मूल्यमापन-2 च्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरविण्यात येणार आहेत.
इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करावयाच्या आहेत. इयत्ता 1 ली व 2 रीसाठी सर्व विषयांच्या व इयत्ता 3 री ते 9 वी अन्य विषयांच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करण्यात येणार आहे. आता वार्षिक परीक्षा राज्यभरात 22 ते 26 एप्रिल कालावधीत होणार आहे. राज्यभरातील माध्यमांच्या शाळांचा निकाल हा 1 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 2 मेपासून सर्व शाळांची उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत.
किती सुट्ट्या कमी होणार
शिक्षकांना सुट्ट्या या एक मेनंतर लागतात. पण यंदा विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या मात्र सुमारे दहा ते पंधरा दिवसांनी कमी होणार आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा या दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्यावर होतात. शक्यतो, एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परीक्षा संपलेला असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टा लागतात. त्यामुळे यंदा मात्र वार्षिक परीक्षा उशीरा होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या कमी झाल्या आहेत. २६ एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर लगेच पाच दिवसात शिक्षकांना निकाल तयार करायचा आहे. परिक्षांचे पेपर तपासून पाच दिवसांत निकाल कसा तयार करायला आहे, हा शिक्षकांचा सवाल आहे. शाळांचे दिवस वाढवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर काय परिणाम होईल ते असरच्या पुढील अहवालात समोर येईल.