Download App

Vaishnavi Hagawane Case : दिमतीला थार अन् बलेनो, 7 दिवसांत राजेंद्र हगवणेने गाठली 11 ठिकाणं

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर सासरा आणि दीरालाही बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना पहाटेच्या दरम्यान, पुणे पोलिसांनी एका खेडेगावातून अटक केलीयं. मागील सात दिवसांपासून हे दोघेही बापलेक फरार होते. अखेर शुक्रवारी पहाटे त्यांना अटक केली. पण या बापलेकांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना इतका वेळ का लागला? तब्बल सात दिवस दोघे पोलिसांना गुंगारा देत कुठं फिरत होते याची माहिती आता समोर आली आहे.

Vaishnavi Hagawane Case : ब्रेकिंग! सासरा राजेंद्र हगवणे अन् दीर सुशीलच्या मुसक्या आवळल्या…

सात दिवसांत राजेंद्र हगवणे कुठं-कुठं फिरला?

गेल्या सात दिवसांत वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे सारखा फिरत होता. राजेंद्र आणि सुशील हगवणेंच्या अटकेनंतर पोलीसांच्या रेकॉर्डनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. 17 मे रोजी तर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता अशी माहिती समोर आली आहे. यानंतर त्याने थार गाडीनेच मुहूर्त लॉन्स गाठलं. वडगाव मावळ, पवन डॅम येथील फार्म हाऊस आणि नंतर आळंदी येथील लॉजवर त्याच्या गाडीची चाक थांबली. एकाच दिवसात इतका प्रवास त्याने केला.

पुढे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 मे रोजी मात्र त्याच्या दिमतीला बलेनो गाडी होती. यानंतर त्याने पुन्हा वडगाव मावळ गाठलं. पुढे पवना डॅमने येथे राजेंद्र हगवणे गेल्याची नोंद आहे. 19 मे या तिसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील एका जणाच्या शेतातही राजेंद्र हगवणे गेल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पसरणी मार्गे कोगनोळीतील हॉटेल हेरिटेजमध्ये त्याची पावली पडली होती. पुढे 21 मे या दिवशी कोगनोळी येथील मित्राच्या शेतावर राजेंद्र हगवणे काही काळ होता. नंतर 22 मे रोजी राजेंद्र हगवणे पुण्यात परत आल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हुंड्यासाठी वैष्णवीचा सासरच्या लोकांनी शारिरीक आणि मानसिक छळ केला होता. त्यामुळेच वैष्णवीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांकसह सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत येत्या 26 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र, दीर सुशील यांनाही आज (शुक्रवार) अटक करण्यात आली.

हगवणे कुटु्ंबियांना मकोका लागणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं..

follow us